औरंगाबाद - Aurangabad :
विभाग, मध्य रेल्वेमधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरिता तसेच इतर तांत्रिक कामामुळे नॉन-इंटरलॉक ब्लॉक घेण्यात आल्याने नांदेड - पनवेल - नांदेड ही विशेष रेल्वे परळी, लातूर ऐवजी परभणी- औरंगाबाद- मनमाड- नगर- दौंड मार्गे गुरुवारपासून (दि.18) धावणार आहे.
दक्षिण-मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नांदेड - पुणे - पनवेल विशेष रेल्वेला कुर्डवाडी ते दौंड दरम्यान काही कामासाठी होत असलेल्या ब्लॉक निमित्ताने 15 मार्चपासून एक एप्रिलपर्यंत रद्द करण्याचे ठरवले होते.
मात्र, मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक गजानन मल्या यांच्याशी दूरध्वनीव्दारे चर्चा करत मराठवाडा विभागातून पुण्याला जाणारी एकमेव रेल्वे असल्याचे कळवून सदर रेल्वेला परभणी- औरंगाबाद- मनमाड- नगर- दौंड मार्गे चालविण्याची मागणी केली होती.
गाडी क्र. 07164 नांदेड - पुणे - पनवेल विशेष रेल्वे 18 मार्च पासून आठवड्यातून चार वेळा म्हणजे दर सोमवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवार रोजी नांदेड येथून सायंकाळी 5.35 ला निघून पूर्णा 6.10, परभणी 6.50, सेलू 7.30, परतूर 7.50, जालना येथे रात्री 8.30, औरंगाबाद 10.30 पुढे मनमाड मार्गे पुण्याला दुसर्या दिवशी सकाळी 9.25 ला तर अखेर पनवेल येथे दुपारी 12.30 वाजता पोहोचणार. परतीत गाडी क्र 07163 पनवेल - पुणे - नांदेड विशेष रेल्वे आठवड्यातून 4 वेळा म्हणजेच दर मंगळवार, गुरूवार, शुक्रवार आणि रविवारी रोजी दुपारी चार वाजता पनवेल येथून निघून पुण्याला रात्री 7.25 पुढे दौंड-नगर-मनमाड मार्गे औरंगाबाद येथे दूसरा दिवशी सकाळी 6.10, जालना 7, परतूर 7.30, सेलू 7.50, परभणी 8.45, पूर्णा 9.15 तर अखेर नांदेड येथे दुपारी 11.30 ला पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेत चार एसी कोचेस, 13 स्लीपर, 2 सेकेंड सीटर आणि 2 महिला गार्ड सहीत एकूण 21 डब्यांची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
आमच्या या मागणीला प्रतिसाद देत गजानन मल्या यांनी मध्य रेल्वे विभागाशी संपर्क साधले आणि सदर रेल्वेला मनमाड मार्गे वळविण्यात आले असून मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, कादरीलाला हाशमी, प्रवीण थानवी, ओंकार सिंग ठाकुर, राजेंद्र माने, दयानंद दीक्षित, किरण चिद्रवार, उमाकांत जोशी, अमित कासलीवाल इत्यादींनी महाव्यवस्थापक गजानन मल्या यांना धन्यवाद कळविले आहे.