लाॅकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी बिअर कंपन्या अडचणीत

'बिअर हब'चे ८० कोटीचे नुकसान
लाॅकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी बिअर कंपन्या अडचणीत

औरंगाबाद - Aurangabad :

उन्हाळ्यातील ४ महिन्यात बिअर व्यवसाय ४० टक्क्यांनी वाढत असतांना सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे ताे "ड्राय' झाला आहे.

मद्यविक्रीतून शासनाला वर्षाकाठी १७ हजार कोटीचा महसूल देतो. यंदा व्हॅट ३५ वरून ४० टक्के केल्याने बिअर महागली आहे. विक्रीवर निर्बंध असल्याने दीव, दमन, गोव्यातून चोरट्या मार्गाने बिअर येत आहे. राज्याचा महसूल बुडतोय. शासनाने मद्यविक्रीसाठी एसओपी ठरवून द्यावी. विक्री झाली तर उत्पादन होईल. मद्याला जीएसटीच्या कक्षेत आणावे.

केशव लिला, संचालक लिलासन्स इंडस्ट्रिज लिमीटेड, वाळूज

यंदा कंपन्या बंद नसल्या तरी विक्रीवर निर्बंध असल्याने मालाला मागणी नाही. तयार माल पडून असल्याने काही कंपन्यांनी उत्पादन बंद तर काहींनी घटवलेय.

देशातील महत्त्वाच्या "बिअर हब'चे ८० कोटीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कामगार कपातीच वेळ आली आहे.

गोदावरीचे "सिलीका' रहित पाणी आणि शहराचे भौगोलिक ठिकाण बिअर उत्पादनासाठी फायदेशीर ठरते.

यामुळेच वाळूज एमआयडीसीत ६ ब्रेव्हरीज तर चिकलठाणा, शेंद्रा आणि गंगापूर रोडवर प्रत्येकी २ अशा ६ डिस्टीलरीज कंपन्या आहेत. ब्रेव्हरीजमध्ये बिअरसह अन्य शीतपेय तयार होतात. डिस्टीलरीजमध्ये मद्यनिर्मिती केली जाते. या उद्योगांना फटका बसलाय.

बिअर उत्पादन ठप्प

वाळूजच्या लिलासन्स इंडस्ट्रीजमध्ये महिन्याकाठी खजुराहो आणि कांगारू बिअरच्या ६ लाख तर टूबर्गच्या ३.५ लाख केसेसची निर्मिती होते.

एका केसमध्ये ६५० एमएलच्या १२ बाटल्या प्रमाणे खजुराहोच्या ७२ लाख बाटल्या तयार होतात. सद्या खजुराहोेच्या ७ हजार केस म्हणजे ८४ हजार बाटल्या तयार होत आहेत.

काल्सबर्गमध्ये सुमारे १० लाख केस तर युनायटेट ब्रेव्हरीजच्या किंगफिशरमध्ये १५ लाख केस बिअरची निर्मिती होते.

फेब्रुवारी ते जून दरम्यान मागणी ४० टक्क्यांनी वाढल्याने कंपन्या १०० टक्के क्षमतेने उत्पादन करतात. मात्र, एका कंपनीचे उत्पादन बंद आहे तर उर्वरीत १० ते १५ टक्के निर्मिती करत असल्याचे लिलासन्स इंडस्ट्रिजचे संचालक केशव लिला म्हणाले.

८० कोटी रूपयांचे नुकसान

परमीट रूम, वाईन शॉप आणि बिअर शॉपी बंद असल्याने मालाला मागणी नाही. माल पडून आहे. कस्टमच्या नियमाप्रमाणे अन्यत्र मालाची साठवणूक करता येत नाही.

गोडावून फुल्ल असल्याने दोन दिवसात उत्पादन बंद करणारे असल्याचे केशव लिला म्हणाले. महिनाभरात ८० ते ८५ कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कंपनी बंद असली तरी कर्मचाऱ्यांचे वेतन, पाणीपट्टी, वीजबील, कर्जाचे हप्तेही सुरू आहेत. कंपन्यांवर अवलंबून असणारे कोरूगेटेड बॉक्स, बॉटल सप्लायर, धान्य पुरवठादार, केमीकल सप्लायर आणि वाहतूकदारांवरही कुऱ्हाड कोसळली आहे.

बिअरची मागणी घटली

थंड बिअरमुळे सर्दी, घसादुखीच्या भीतीने लोकांनी बिअरचे सेवन कमी केले आहे. उत्पन्न घटल्याने लोकं स्वस्त व्हिस्कीकडे वळले आहेत. यामुळे मागणी घटल्याचे लिला म्हणाले. होळीसाठी गावाला गेलेले कामगार परतलेच नाहीत. लिलासन्समध्ये एरवी १८५ कर्मचारी लागतात. सद्या ६० लोकं काम करतातयत. ऐन सिझनमध्ये ३ ऐवजी एका शिफ्टमध्ये काम सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com