गौताळा अभयारण्यातून मौल्यवान गारगोट्यांचे उत्खनन

७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
गौताळा अभयारण्यातून मौल्यवान गारगोट्यांचे उत्खनन

औरंगाबाद - Aurangabad :

गौताळा औट्रमघाट अभयारण्यातून मौल्यवान खडकाचे (गारगोटी) उत्खनन करणाऱ्या तीन जणांना वन्यजीव विभागाने जेरबंद केले आहे.

त्यांच्याकडून मौल्यवान खडकांसह एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, निलगाय, सायाळ यासह १९ सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी प्रामुख्याने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदेसह या भागात मौल्यवान खडकही ( गारगोटी) मोठ्या प्रमाणावर आहेत.

पाटणा परिसरात काही जण मौल्यवान खडकांचे उत्खनन करीत असल्याची माहिती वन्यजीव विभागाला समजली.

त्याआधारे विभागीय वन अधिकारी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नडचे सहायक वनसंरक्षक एस. पी. काळे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण, वनपाल डी. एस. जाधव, वनरक्षक अजय महिरे, एन. एस. देसले, राजाराम चव्हाण, गोरख चव्हाण, नाना पवार, शुभम राठोड, लालचंद चव्हाण यांनी सापळा रचला.

उत्खनन करणारे सुखदेव पवार ( वय ४८), भगवान बबन शेलार (वय ४९, दोघे रा. पाटणा) शेख राजीक शेख नाजीर (वय ४८, रा. शिवना, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ किलो वजनाच्या मौल्यवान खडकासह ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com