पाटणादेवीच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांवर चंदनचोरांचा हल्ला

पाटणादेवीच्या जंगलात वन कर्मचाऱ्यांवर चंदनचोरांचा हल्ला

वनखात्यातील रिक्त पदांमुळे चाेरटे सरसावले

औरंगाबाद - Aurangabad :

गौताळा अभयारण्यातील पाटणादेवीच्या घनदाट जंगलात मध्यरात्री चंदनचोर आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. निशस्त्र कर्मचाऱ्यांवर सशस्त्र चोरट्यांनी हल्ला केला.

महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी तो परतावून लावला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून चंदन आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. वनखात्यातील रिक्त पदांमुळे चोरीच्या अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

पाटणादेवीच्या अंबाला (ठाकुरवाडी) अभयारण्यात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विजय सातपुते यांनी सतर्क राहण्याची सूचना केली हाेती.

अशातच सूत्रांकडून येथे चंदन चोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ३१ जुलै रोजी रात्री १ च्या सुमारास कन्नडच्या सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) आशा चव्हाण १४ जणांचा फौजफाटा घेवून जंगलात रवाना झाल्या.

अंधारात २ तास झटापट

आशा चव्हाण आणि त्यांच्या टीमने अंधारात जंगलात पैदल गस्त केली. यावेळी पाऊसही सुरू होता. त्यांना पाहताच ८ ते १० चोरट्यांनी डोंगराच्या दिशेने पळायला सुरूवात केली. कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला.

चोरट्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडी, काठ्या आणि टॉमीने हल्ला केला. निशस्त्र कर्मचारी जीवघेणा हल्ला परतावून लावत चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यात दोन तास झटापट सुरू होती. नंतर मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

चंदन, शस्त्र जप्त

घटनास्थळाहून चंदनाचे ११.६०० किलोग्र्रॅम वजनाचे अर्धा ते दोन फुट आकाराचे १०० नग, करवत, टॉमी, कानस आणि गुलेर जप्त करण्यात आले. आरोपींविरूद्ध वनगुन्हे नोंदवण्यात आले असून वनपाल मनोज उदार तपास करत आहेत.

यांनी टाकली धाड

विजय सातपुते आणि चाळीसगावचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नागद वन्यजीव विभाग सागर ढोले, वनपाल एस.आर.मोरे, के.बी.रायसिंग, वनरक्षक दांडगे, लटपटे, समाधान पाटील, राम डुकरे, अनिल चव्हाण, सोनार, चंदवडे, कल्याण खोकड, काकरवाल,अजय मेहर आणि हरिश उप्पलवाड.

महत्त्वाची पदे रिक्त

जंगलाचा विस्तार आणि कर्मचाऱ्यांची कमरतात याचा फायदा घेत येथे सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. यात प्रामुख्याने कन्नडचे सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी- चाळीसगाव (वन्यजीव), वनपाल २ पदे, वनरक्षक ३ पदे रिक्त आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com