मोबाइल टॉवरच्या बॅटर्‍याया चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

35 बॅटर्‍या जप्त
मोबाइल टॉवरच्या बॅटर्‍याया चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबाद - Aurangabad :

मोबाइल टॉवरच्या बॅटर्‍याया चोरणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या टोळीने औरंगाबादसह अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून बॅट-या चोरी केल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सध्या 35 बॅटर्‍या, रोख आणि ट्रक असा पाच लाख 61 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

सिकंदरसिंग शक्तीसिंग जुन्नी (रा. अलाना कंपनीजवळ, गेवराई तांडा), जितेंद्रसिंग टाक, तय्यब रशीद शेख (रा. नेवासा, जि. अहमदनगर), रईस रऊफ कुरेशी (रा. चितेगाव) आणि विलास बाळासाहेब वाणी (रा. केडगाव, जि. अहमदनगर) अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

खोडेगावातील इंडस आयडी येथील मोबाइल टॉवरच्या 44 बॅट-या चोरीला गेल्याचा प्रकार 6 एप्रिल रोजी उघडकीस आला होता. त्यावरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षक बाळासाहेब शिवाजीराव खराबे (40, रा. कन्हैय्यानगर) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना सिकंदरसिंग जुन्नी याने मोबाइलच्या बॅटर्‍या चोरी केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत जुन्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्या चौकशीतून आणखी चौघांची नावे समोर आली.

पोलिसांनी तपास चक्रे फिरवत जितेंद्रसिंग टाक, तय्यब शेख, रईस कुरेशी यांना ताब्यात घेत मोबाइल टॉवरच्या बॅटर्‍यांबाबत चौकशी केली. तेव्हा चौघांनी नेवासा तालुक्यातील रविंद्र विठ्ठल उंडे (रा. कुकाणा) याच्या मदतीने बॅटर्‍या विकल्याची माहिती दिली.

त्यावेळी उंडे हा तय्यब शेख याच्या ट्रक (एमएच-20-सीटी-9262) ओळखीचा विलास वाणी याच्या मार्फत बॅट-या विक्री करायचा असे समोर आले. त्यानंतर रईस कुरेशी, तय्यब शेख आणि वाणी या तिघांकडून 35 बॅट-या, रोख, ट्रक, मोबाइल असा पाच लाख 61 हजारांचा ऐवज जप्त केला.

बॅटर्‍या चोर टोळीने अहमदनगर जिल्ह्यातही धुमाकूळ घातल्याची कबुली दिली आहे. या जिल्ह्यातून टोळीने अकरा बॅट-या चोरल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी सिल्लेगाव, गंगापूर, एमआयडीसी पैठण, बिडकीन, खुलताबाद, सिल्लोड ग्रामीण आणि अहमदनगरातील शेवगाव येथून बॅटर्‍या लांबवल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com