औरंगाबाद - Aurangabad :

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सध्या राजकीय पक्षांमध्ये ‘शोनार बांग्ला’साठी (सुवर्णमयी प. बंगाल) जोरदार संघर्ष सुरू आहे.

पण इकडे एका पश्चिम बंगालच्या कारागिराने शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांकडून तब्बल ७७ सोने लुबाडून त्यांना वेगळ्या अर्थाने ‘शोनार बांग्ला’चा हात दाखवला आहे.

त्याच्या हातचलाखीची ही ‘काळी जादू' पाहून सराफा व्यापारी पुरते हवालदिल झाले आहेत.शहरातील दोन सराफा व्यापाऱ्यांचे ७७ तोळ्यांचे दागिने घेऊन बंगाली कारागिर पसार झाला आहे.

शेख असद्दुल शेख लियाकत (रा. मोमीनपुरा, मूळगाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे या कारागिराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सिडकोतील अजय गोवर्धनदास मेवलानी (४५, रा. एन-३) यांच्या शहरात दोन दुकाने आहेत. त्यांची शेख असद्दुल याच्याशी चार ते पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती.

या ओळखीतून मेवलानी हे नेहमी शेख असद्दुलला कच्चे सोने दागिने घडविण्यासाठी द्यायचे. मेवलानी यांनी त्याला सोन्याचे बिस्किट, लगड आणि दुरुस्तीसाठी म्हणून तब्बल ५४ तोळ्यांचे दागिने असा एकूण ७७ तोळ्यांचा ऐवज दिला होता.

मात्र, हे दागिने घेतल्यावर शेख असद्दुल परत आलाच नाही. वाट पाहून मेवलानी यांनी शेख असद्दुल याचे मोमीनपुरा भागातील घर गाठले. तेव्हा तो घरी नव्हता तसेच त्याचा मोबाईलसुध्दा बंद होता.

अशाच प्रकारे आणखी एका सराफा व्यापाऱ्याने त्याला २६ तोळ्यांचे दागिने दिले आहेत. फसवणूकप्रकरणी मेवलानी यांनी सिटीचौक ठाण्यात तर एका व्यापाऱ्याने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मुजगुले करत आहेत.