औरंगाबादेत करोना रुग्णसंख्या घटली ही समाधानाची गोष्ट

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
औरंगाबादेत करोना रुग्णसंख्या घटली ही समाधानाची गोष्ट

औरंगाबाद - Aurangabad :

करोना रुग्णांची घटती संख्या ही समाधानाची बाब आहे, मात्र अजूनही आपली करोना विरुध्दची लढाई संपलेली नाही. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, डॉक्टर्स यांच्यातील एकजूट व समन्वयाने आपण करोनाला निश्चित हरवू, यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पालकमंत्री यांनी औरंगाबाद शहर व जिल्हयातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नादुरुस्त व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण मोहीम, खाजगी रुग्णालय आकारत असलेले वाढीव दराचे बिलं, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, यांचा सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्री यांनी घेतला.

बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, अंबादास दानवे, सतीष चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त्‍ डॉ.निखील गुप्ता, महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॅा.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पाडळकर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची बाब धक्कादायक आहे. याची निश्चितीच दखल घेतली जाईल. रुग्णांच्याबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाबाबत कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान राज्य शासनाकडून रुग्णांसाठी यापूर्वी चांगले व्हेंटीलेंटर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापुढेही चांगल्या दर्जाचे व्हेटिलेटर्स उपलब्ध करुन दिले जातील. शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत आहे. मृत्यूसंख्याही वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 25 किंवा 25 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरु करावे. ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, त्यासाठी त्यांना मदत करावी. लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले.

खाजगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ॲडिटरमार्फत त्याची कडक पध्दतीने तपासणी करावी व रुग्णांची लूटमार होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हयातील कोरोनाची स्थिती व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व लोकप्रतिनिधीं, डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने व एकजुटीने जिल्हयातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. ब्रेक द चेनच्या माध्यमातून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात तपासणी व कॉन्टॅकट टे़सिंगवर भर दिला जात आहे. पुरेशा प्रमाणात बेड व ऑक्सिजन उपलब्ध आहे. महानगरपालिकेकडूनही कोरोना रुग्णांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. एमएचएमएच ॲप व नियंत्रण कक्षातून रुग्णांना आवश्यक ती माहिती मिळण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागातही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याठी आतापासूनच नियोजन करण्यात आले आहे. या लाटेचा बालकांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com