भाजपा आमदाराचे कौतुकास्पद कार्य; उभारले १०२ खाटांचे कोविड रुग्णालय

रुग्णांना मिळणार मोफत उपचार
भाजपा आमदाराचे कौतुकास्पद कार्य; उभारले १०२ खाटांचे कोविड रुग्णालय

औरंगाबाद - Aurangabad :

करोना रूग्णांवर उपचारासाठी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी १०२ खाटांचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारले आहे.

येथील प्रत्येक बेडला ऑक्सीजनचा पुरवठा असून व्हंेटीलेटरचीही सोय आहे. अखंडीत ऑक्सीजनसाठी हवेतून ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे.

रूग्णांवर उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम असून प्रत्येकावर विनामूल्य उपचार होतील. सोबत पोषक आहारही दिला जाईल. लोकप्रतिनिधीने सुरू केलेले विभागातील हे पहिले कोव्हीड रूग्णालय असून विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी व्हर्चुअल उद्घाटन करण्यात आले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराच्या बरोबरीने ग्रामीणमध्येही रूग्ण निघत आहेत. या लाटेने काल-परवा पर्यंत सोबत असणारे मित्र, नातेवाईक गमावले.

अनेक जण उपचाराच्या भीतीने तर काही खर्चाला घाबरून दुुखणे अंगावर काढतात. ऑक्सीजन नसल्यानेही अनेकांना जीव गमवावे लागत आहेत.

ग्रामीण भागातील नागरीकांकडे शहराप्रमाणे आरोग्यविमा नसल्याने खर्चाचा माेठा प्रश्न असतो.

ही बाब लक्षात घेवून ग्रामीण भागात लासून येथे सुसज्ज कोविड हॉस्पीटल उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

मृत्युला संधीच नाही

लासूर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या तीन मजली जैन मंगल कार्यालयाच्या इमारतीत "गीताबन आयसीयू कोव्हीड हॉस्पिटल' सुुरू करण्यात आले आहे. अत्यंत गंभीर रूग्णांसाठी पहिल्या मजल्यावर २२ आयसीयू बेड आहेत.

सौम्य रूग्णांसाठी दुसऱ्या मजल्यावर ३८ तर सामान्य रूग्णांसाठी तिसऱ्या मजल्यावर ४२ बेडची सोय आहे. प्रत्येेक बेडला एनआयव्ही बायपॅप मशीनचे कनेक्शन असल्याने १०० टक्के रूग्णांना ऑक्सीजनची सोय झाली आहे.

गंभीर रूग्णांना कृत्रिम श्वाच्छोच्छासासाठी ५ व्हेंटीलेटर आहेत. कितीही गंभीर रूग्ण असला तरी त्यावर उपचार होवून मृत्युला संधीच देणार नसल्याचे बंब यांनी सांगीतले.

१४ तज्ञ डॉक्टरांचा ताफा

रूग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकाची जबाबदारी डॉ.रणजीत गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांच्यासोबत एमबीबीएस, एमडी, एमएस असणारे डॉ.चिंतन पटेल, शैलेंद्र बाधले, प्रफुल्ल पवार, रंगरेज आरिफ, अविनाश हुंबे आणि अनुप्रित सातपुते तर बीएचएमएस असणारे डॉ.किशोर पवार, कप्तान सिंग, चंद्रकांत बोर्डे, आबरार शेख, अविनाश चन्ने, संंकेत चन्ने आणि विशाल पवार सेवा बजावतील. सोबतीला नर्स, एएनएम, जीएनएम, आेटी साठी २५ जणांचा स्टाफ आहे. ही मंडळी २४ तास उपस्थिती असतील.

...अन ऑक्सीजन प्लांट उभारला

देशभरात ऑक्सीजनच्या कमतरतेचे प्रसंग घडत आहेत. रिकामे सिलींडर भरण्यासाठी इतरत्र जावे लागल्याने वेळ जातो. हे टाळण्यासाठी बंब यांनी रूग्णालयाच्या शेजारी हवेतून आॅक्सीजन निर्मितीचा एअरोक्स मशीन प्लांट सुरू केला आहे. यातून दिवसाकाठी १०० सिलींडर ऑक्सीजन निर्मिती होणार आहे. ते पाईपलाईनद्वारे रूग्णाच्या बेडपर्यंत पोहचेल. काही कारणाने प्लांटमध्ये बिघाड झाल्यास ऑक्सीजन भरलेले १५० सिलींडर तयार ठेवण्यात आले आहेत.

उपचार, जेवण विनामूल्य

संपूर्ण रूग्णालयावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आहे. विविध तपासण्यांसाठी प्रयाेगशाळा, इसीजी, एक्सरे, शॉकची सुविधा आहे. अखंडीत वीजपुरवठ्यासाठी जनरेटर आणि इन्वरटर आहे. उपचारासहित सकाळ-संध्याकाळ चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण रूग्णालयाकडून दिले जाईल. रक्त तपासणी आणि औषधीचा खर्च मात्र रूग्णांना करावा लागेल.

दहा दिवसात काम पूर्ण

बंब म्हणाले, रूग्णालय सुरू करण्याचे ठरताच आवश्यक कामांची यादी तयार केली. २० टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येकाला एकेक जबाबदारी दिली. तीन दिवसात संपूर्ण ऑक्सीजनची पाईपलाईन बसवली. मंगल कार्यालयाची इमारत तयार असल्याने अवघ्या १० दिवसात काम पूर्ण होवून अकराव्या दिवशी रूग्णालय सुरू झाले.

१.५ कोटी खर्च, ६० लाख महिना

रूग्णालयासाठी १.५ कोटी रूपयांचा खर्च आला. मात्र, तो आमदार निधीतून खर्च न करता दानशूरांच्या सहकार्यातून जमा केला. आदर्श ग्रामीण विविध सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हे काम झाले. रूग्णालय सुरू झाल्यावर महिन्याला ६० लाख रूपयांचा खर्च लागणार आहे. तो सुद्धा दानशूरांच्या मदतीने उभारू, असा विश्वास बंब यांनी वर्तवला.

तिसरी लाट थोपवू

बंंब यांनी मतदारसंघात लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांचे स्वंयसेवक गावागावात फिरून लसीकरणासाठी नागरीकांना घेवून जातात. औरंगाबादेतही ५ रूग्णालयांसोबत करार केला असून येथेही विनामूल्य लसीकरण केले जात आहे. लक्षणे दिसणाऱ्यांच्या करोना चाचण्या करायला नेतात. कोविड रूग्णालय ३ महिने चालवण्याचे नियोजन आहे.

माेठ्या प्रमाणात लसीकरणामुळे तिसरी लाट थोपवू असा विश्वास वाटतोय. मात्र, गरज पडली तर रूग्णालय सुरू ठेवू.

करोना संपल्यावर धर्मादाय रूग्णालय उभारुन येथील यंत्रसामग्रीचा तेथे वापर करू. येथे रूग्णसंख्या वाढल्यास अजून एक इमारत तयार ठेवली आहे.

तर सिद्धनाथ वडगाव येथे तयार असणाऱ्या उपजिल्हा रूग्णालयात आमदार निधीतून ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याचे बंब म्हणाले. उद्घाटनाला खासदार डॉ.भागवत कराड उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com