कोविड विमा लाभापासून राज्यातील शिक्षक वंचित !

आतापर्यंत ६८ शिक्षकांचा करोना सेवा देतांना मृत्यू
कोविड विमा लाभापासून राज्यातील शिक्षक वंचित !

औरंगाबाद - Aurangabad :

राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड १९ अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास लाखाचे विमा कवच शासनाने लागू केले आहे.

या दरम्यान कोविड सेवेत असतांना मृत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप क्लेम मिळाले नाही, अशा राज्यातील ६८ पीडित शिक्षक परिवारांना त्वरित विम्याचे क्लेम देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोविड सेवेत कार्यरत असतांना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे, शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असतांना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत हे विशेष.

यापैकी कोणालाच ५० लाखाचे विमा क्लेम मिळाला नाही असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले आहे.

शिक्षक समितीने याबाबत राज्यभरातून ऑनलाइन व जिल्हा शांखाकडुन माहिती मागवली असून त्यात सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत तर सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे झाले आहे. नगर ३,अमरावती २, औरंगाबाद ४, बीड १, चंद्रपूर २, गडचिरोली १, गोंदिया ३, जळगाव ८, कोल्हापूर ३, नागपूर ४, नांदेड ४, नंदुरबार ५, नाशिक १, परभणी ३, पुणे ३, सोलापूर ३, ठाणे २, उस्मानाबाद १, वर्धा ३, यवतमाळ ४, रत्नागीरी १ याप्रमाणे जिल्हावार मृत शिक्षकांची संख्या आहे. यात काही जिल्हाची संख्या प्राप्त नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com