करोनाग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची आत्महत्या

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात घडला प्रकार
करोनाग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची आत्महत्या

औरंगाबाद - Aurangabad - प्रतिनिधी :

शहरातील घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन एका करोना रूग्णाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२७ सप्टेंबर) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. काकासाहेब श्रीधर कणसे (४२, रा. धनगाव, पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.

कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तसेच पंचायत समिती सदस्यही होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केली.

या प्रकरणात घाटी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काकासाहेब श्रीधर कणसे यांचा २१ सप्टेंबरला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २४ सप्टेंबरला दुपारी चार वाजेच्या दरम्यान अतिदक्षता विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

रविवारी सकाळी त्यांनी शौचालयाला जायचे असल्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णाला शौचालयात नेण्यात परवानगी नसल्याने, त्यांना पॉट देण्यात आले.

त्यानंतर कर्मचारी बाहेर थांबले होते. काकासाहेब कणसे यांनी कोणालाही न सांगता, त्याच्या बेडजवळ असलेल्या खिडकीतून खाली उडी मारली, अशी माहिती सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर जाधव यांनी दिली. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, रविवारी (२७ सप्टेंबर) पहाटे पाच वाजताच्या दरम्यान काकासाहेब कणसे यांनी त्यांचा भाऊ गणेश कणसे याला फोन करून धनगावहून औरंगाबादला यायला सांगितले. गणेश कणसे हा चित्तेगावपर्यंत आला असता, काकासाहेबने पुन्हा गणेश कणसे याला फोन केला.

काकासाहेब यांनी आपल्याला खासगी रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. गणेश कणसे हे इमारतीच्या जवळ आले. पण त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. शेवटी सकाळी ११ वाजता काकासाहेब कणसे यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, असे गणेश कणसे याने सांगितले.

दरम्यान, काकासाहेब कणसे यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्या चित्तेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्या सकाळपासून गणेश कणसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत होत्या. त्यांनी काय जेवण केले? ते फोन का घेत नाहीत? संगळ ठीक आहे ना? अशी विचारणा फोनवरून करत होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com