उद्योजकांवर होणारे हल्ले रोखा

उद्योजकांवर होणारे हल्ले रोखा

मुंबई | प्रतिनिधी

उद्योगनगरी औरंगाबादमध्ये उद्योजकांवर सातत्याने होत असलेले हल्ले गंभीर असून ते तातडीने रोखवेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली.

उद्योजकांवरील हल्ल्यामुळे महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा आदींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत. तसेच जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील फडणवीस यांनी केली आहे.

औरंगाबादमधील भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना गुंडांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याची दखल घेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय गेल्या आठ- दहा महिन्यांपासून उद्योजकांना कोणत्या प्रकारचा त्रास दिला जातो याची माहिती फडणवीस यांनी पत्रात दिली आहे.

गाडीत पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरूस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. अशा प्रकरणात पोलीस तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणामी वर्षोनुवर्षे न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते, याकडे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूकीच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये कठोर कलमे लावून हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वत: यात लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com