भुसावळ येथे जवानाची गोळी झाडून आत्महत्या
महाराष्ट्र

भुसावळ येथे जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

येथील मिलीटरी स्टेशनमध्ये कार्यरत असलेले नायक मंगेश भगत यांनी ते मेस वॉटर पंप येथे कर्तव्यावर असतांना त्यांच्या रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली. याबाबत शहर पो.स्टे.ला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

घटनेबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाईक कुंदनसिंग भंवरसिंग राठोड यांनी दिलेल्या खबरीनुसार ते दि. 4 मार्च 2020 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पावेतो मेस वॉटर पंप भुसावळ येथे सेंट्री ड्युटी करीत होते. त्यांच्यासोबत शिपाई आर.एम. भागाराम, के. किशोर एपी, नायक मंगेश जिनवर भगत असे ड्युटीस होते.

सकाळी 6 ते 8 मेनाराम, 8 ते 10 केपी नायक यांची ड्युटी तर 10 ते 12 कुंदनसिंग राठोड यांची ड्युटी होती. नायक मंगेश भगत हे गार्ड अंमलदार होते. ते सुद्धा येथे हजर होते. मंगेश भगत यांनी कुंदनसिंग राठोड यांना सांगितले की, मी हजर असल्याने मी ड्युटी करतो. तुम्ही आराम करा. यावरून कुंदनसिंग राठोड हे गार्डरूममध्ये बसले. नायक मंगेश भगत यांनी त्यांची रायफलनं. 10 इनसास 5.56 व 20 राऊंड अ‍ॅम्युनेशन घेवून ते पहारा करीत होते. सकाळी 11.05 वाजता कुंदनसिंग राठोड यांना रायफलमधून गोळी फायर झाल्याचा जोरात आवाज आल्याने ते तात्काळ बाहेर येवून पाहतात तर नायक मंगेश जिनवर भगत हे दरवाजासमोर खुर्चीच्या खाली पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या कपाळापासून वर डोक्यास जखम होवून रक्त निघत होते. जमिनीवर राऊंड फायर झाल्याचे खाली काडतूस व एक जिवंत राऊंड बाजूला पडलेला दिसत होता. त्यावरून मंगेश भगत यांनी रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

श्री. राठोड यांनी त्वरीत बीएचएम अधिकारी यांना फोनवरून घटना कळविली. नायक मंगेश भगत यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली? याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

अशी खबर दिल्यावरून शहर पो.स्टे.ला अकस्मात मृत्यु रजि.क्र. 6/20 प्रमाणे नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास हेकाँ नागेश तायडे व हेकाँ अनिल चौधरी यांनी केला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com