नड्डांनी कारवाईचे आश्वासन दिल : दिल्लीवारीनंतर खडसेंचे सूर बदलले

नड्डांनी कारवाईचे आश्वासन दिल : दिल्लीवारीनंतर खडसेंचे सूर बदलले

जळगाव  – 

ज्यांनी पक्षविरोधी काम केलेले असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यानंतर एकत्र बसून चांगला निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन जे.पी.नड्डांनी दिलेले असून त्यामुळे काय कारवाई होते. हे पहावे लागेल असे सांगत भाजपातील नाराज नेते.एकनाथराव खडसे यांनी दिल्लीवारीनंतर आपले सुरु बदलल्याचे स्पष्ट संकते दिले आहे.

भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चार दिवसांपूर्वी चर्चा झाल्याची माहिती खडसे यांनी दिली आहे. या चर्चेत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीतील कामकाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजय-पराभव तसेच आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याने काही जागांवर आपल्याला फटका बसला याचीही माहिती त्यांनी घेतली. तुम्ही दिलेली माहिती आणि आमच्याकडील माहितीच्या आधारे आम्ही चौकशी करु, असे आश्वासन जे पी नड्डा यांनी एकनाथराव खडसेंना दिले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी चर्चा करु. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नंतर बोलावून घेऊ. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी पक्षाविरोधात काम केले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करु, असे आश्वासनही जे पी नड्डा यांनी दिल्याची माहिती खडसेंनी दिली आहे.

भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे, मात्र मी समाधानी आहे की नाही, ते कारवाई झाल्यानंतरच सांगेन. मात्र त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता, असंही खडसे म्हणाले.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेच झाला, असा आरोप खडसेंनी केला होता. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता.

पक्षविरोधी काम करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्याची दखल आता केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com