
पुणे |प्रतिनिधी| Pune
फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून एक लाख रुपयांची लाच घेताना पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह दोघे जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 33 वर्ष) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय 45 वर्ष, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. दरम्यान, ही सापळा कारवाई झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला तेथूनच ताब्यात घेतले.
तक्रारदार यांच्या वडिलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
या तक्रारीची पडताळणी ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहगाव येथे संतोष खांदवे याने तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील हे शिवाजीनगर न्यायालयात होते. सापळा कारवाई यशस्वी झाल्याचे समजताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयातून राहुल पाटील यांना ताब्यात घेतले. दोघांवरही विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.