‘करोना’ची दहशत

‘करोना’ची दहशत

2020 या वर्षाची सुरुवातच जगभरातल्या आरोग्यविषयक चिंतेने झाली. आरोग्याला असलेला हा धोका फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही आहे आणि त्याला कारणीभूत आहे करोना व्हायरस. गेल्या काही दिवसांमध्ये हा संसर्ग अधिक धोकादायक बनला आहे.
– मधुरा कुलकर्णी

2019 च्या अखेरीपासूनच चीनमध्ये एका भयावह तापाची सुरुवात झाली होती, परंतु 2020 च्या सुरुवातीपासून हा विषाणू खर्‍या अर्थाने किती भयावह आहे, ते उजेडात आले. चीनच्या वुहान या शहरात 2019 च्या अखेरीला न्यूमोनियाची साथ फैलावली. अगदी सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच चीनबरोबर थायलंड आणि जपानमध्येही या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे संपूर्ण जग खडबडून जागे झाले. या आजाराची गंभीर दखल घेण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 600 जणांचा आणि जगभरात 100 लोकांचा मृत्यू या आजाराने झाला.
अगदी अलीकडच्या अहवालांनुसार या तापाला कारणीभूत असलेल्या आणि चायना करोनोव्हायरस या नावाने ओळखल्या जाणार्‍या या विषाणूचा फैलाव माणसाकडून माणसाला होतो. त्यामुळे साहजिकच रुग्णांना हाताळणारे सेवक आणि डॉक्टर इत्यादींना याचा सर्वाधिक धोका असतो. या विषाणूची संसर्गाची ताकद एवढी प्रचंड आहे की, सध्या तरी जगभरात इतर कोणत्याही आजारापेक्षा हा आजार भयावह ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या विषाणूचे नाव करोनोव्हायरस असले तरीही हा एकच एक विषाणू नाही, हा विषाणूंचा समूह आहे.

या विषाणूचा संसर्ग 2012 पासून लक्षात आला आहे. या विषाणूंच्या समूहाला दोन गटांमध्ये विभाजित केले जाते. मर्स-सीओव्ही आणि सार्स. मर्स म्हणजे मिडल ईस्टर्न रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि सार्स म्हणजे सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम. मर्सचा आजार नावाप्रमाणेच मध्य- पूर्वेत आढळला आणि त्याचा पहिला रुग्ण सौदी अरेबियात 2012 मध्ये सापडला होता. सार्सचे अलीकडच्या काळातील पहिले काही रुग्ण 2003 मध्ये आशियात सापडले होते आणि तिथून जगभर सर्वत्र झपाट्याने पसरले होते, पण त्याआधी 2004 मध्येही सार्सचे रुग्ण आढळले होते.

चीनच्या हुबेई परगण्यातल्या वुहान इथे डिसेंबर 2019 मध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो सार्स करोनाव्हायरसचा उद्रेक आहे की, त्याच्याशी संबंधित इतर प्रकारचा विषाणू आहे, याविषयी तातडीने तपासणीला सुरुवात झाली. सीडीसीच्या अलीकडच्या अहवालांमधून असे स्पष्ट झाले आहे की, हा विषाणूही स्वाईन फ्लूप्रमाणेच प्राण्यांच्या शरीरात पहिल्यांदा तयार झाला असून या प्राण्यांचा आहारात समावेश झाल्यानंतर त्याचा मानवी शरीरांत शिरकाव झाला आहे. डिसेंबरपासून चीनमध्ये या विषाणूमुळे येणार्‍या तापाने काहींचा बळी घेतला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधल्या या विषाणूचा नेमका स्रोत शोधून काढणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. या विषाणूचा फैलाव माणसाकडून माणसाला होत असल्याने आंतरराष्ट्रीय संघटना आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातली व्यवस्थापने अधिक चिंताग्रस्त झाली आहेत.

भारतातही कडक तपासणी

भारतातल्या सात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर या संसर्गासंदर्भात प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येत असून भारतात मुंबईत नुकतेच एका व्यक्तीला या आजाराचा संशयित रुग्ण म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com