वीरगाव | वार्ताहर

आज १ एप्रिल... आजचा दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू.....

झाल्याच्या वार्तेने खुपच गाजला. महाराष्ट्रातील एका वृत्तवाहिनीच्या निवेदनाचा हा जुन्या बातमीचा व्हिडीओ भल्याभल्यांना दचकून गेला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची ही वार्ता सोशल मिडीयावरुन सर्वदूर पसरल्यानंतर अनेकांनी कामधंदा सोडून टीव्हीसमोर बसकनच मारली. व्हाट्सएपला बातमी आली अन् टीव्हीला नाही म्हणून फोनाफोनी सुरु झाल्यावर आपला एप्रिल फूल झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या, दिशा सालियन आत्महत्या, पालघर प्रकरणातील साधुंची हत्या, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, परमवीरसिंगांचे गृहमंत्र्यांवरील आरोप यामुळे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून राष्ट्रपती राजवटीची विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची सातत्याची मागणी आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादेत झालेली भेट यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक काहीही घडू शकते असा संशय जनतेला आहेच. शिवाय पहाटेच्या वेळी शपथविधी उरकून सत्तास्थापनेचे धक्कातंत्र एकदा भाजपाने दिल्याने लोकांचा यावर विश्वास बसला होता.

करोनाबाबत मात्र लोक गंभीर झाल्याने यावर एप्रिल फूल फार झाले नाहीत. करोना कालावधीत एप्रिल फूल केल्यास कायदेशीर कारवाईचा ईशारा देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख दिसले. हा व्हिडीओ देखील एप्रिलफूल साठी बनविल्याची शंका लोकांना आली. कारण,स्वत:च्या इतक्या चौकशा सोडून आम्हाला का दम देता अशीही अनेकांची विनोदी प्रतिक्रिया होती.

राज्यसभेचे खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र हा व्हिडीओ पाहून शहानिशा न करता पेढे वाटायला सुरुवात केली असेल असा अंदाजही काहींनी बांधला. कारण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा याचा खरा पिच्छा केवळ राणेंकडून सुरु आहे.

वैयक्तिक आणि काही राजकीय एप्रिल फूलचे संदेशही आले परंतु सर्वाधिक व्हायरल झाला तो राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाल्याचा संदेश. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना हा एप्रिल फूलचा धक्का काही काळ जोरात बसला होता.

सन २०१४ चा व्हिडीओ!

महाराष्ट्रात शरद पवार हे पुलोदचे मुख्यमंत्री असताना सरकार बरखास्त होऊन १७ फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० या काळात पहिली राष्ट्रपती राजवट होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर २८ सप्टेंबर ते ३१ आक्टोबर २०१४ या ३२ दिवसांसाठी दुस-यांदा राष्ट्रपती राजवट होती. सध्याचे महाराष्ट्रातले पेटलेले राजकारण लक्षात घेता २०१४ ची ही बातमी लोकांना बरोबर फसवून गेली.