खान्देशात लाचखोरांची हॅट्ट्रिक

खान्देशात लाचखोरांची हॅट्ट्रिक

जळगावात हवालदार

जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशनला कार्यरत हवालदार संभाजी शामराव पाटील यास मंगळवारी रात्री दहा हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने पोलीस दलातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजोग बच्छाव तसेच सहा.पोलीस उपनिरीक्षक रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.

पीएसआय झाला गजाआड

येथील मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जावर चौकशी करून कारवाई करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून तडजोडीअंती 40 हजारांची लाच घेणार्‍या उपनिरीक्षकाला नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी मोहाडी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
डोंबिवली (जि.ठाणे) येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय तक्रारदाराचे धुळे येथील घर एका इसमाने खोट्या स्वाक्षर्‍या करुन बळकावले आहे. त्याबाबत त्यांचा तक्रारी अर्ज मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन प्रभाकर गायकवाड (वय 36) यांच्याकडे चौकशीस होता. अर्जाच्या चौकशीत कारवाई करण्यासाठी गायकवाड यांनी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांचे पथक आज धुळ्यात दाखल झाले. पथकाने मोहाडी पोलिस ठाण्यात सापळा रचून उपनिरीक्षक गायकवाड यांनी तड़जोडीअंती तक्रारदाराकडून 40 हजरांची लाच स्विकारली. त्यानंतर त्यांना पथकाने रंगेहात पकडले.ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे, हवालदार सुकदेव मुरकुटे, सुनील गीते, मनोज पाटील, संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.

जिल्हा समन्वयक जाळ्यात

अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या वाहनाचे थकीत रक्कम लवकर मंजूर करण्यासाठी 3 हजाराची लाच स्विकारणार्‍या जिल्हा समन्वयकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदारांनी अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागातून शासकीय योजने अंतर्गत महिंद्रा पिकअप वाहन खरेदी केले होते. त्यावरील व्याज शासन दरमहा तक्रारदारांच्या बँक अकाउंटमध्ये ऑनलाईन जमा करते. सदर व्याजाची थकीत 2 महिन्याची रक्कम लवकर मंजूर करून तक्रारदारांच्या अकाउंटला जमा करावी यासाठी आरोपी लोकसेवक अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कौशल्य विकास विभागाचे जिल्हा समन्वयक योगेश निंबा चौधरी याने मोबदल्यात 3 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम पंच व साक्षीदारांसमक्ष त्यांच्या कार्यालयात स्विकारली. त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलीस उपअधीक्षक शिरिष जाधव, पो.नि.जयपाल अहिरराव, हेकॉ महाजन, हेकॉ गुमाणे, पोलीस नाईक चित्ते, मराठे, नावाडेकर, अहिरे, बोरसे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली. अण्णाभाऊ पाटील महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाबद्दल याआधीही अनेक तक्रारी असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com