राज्यात आणखी दोन ते तीन दिवस रेमडेसिवीर चा तुटवडा

अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती
राज्यात आणखी दोन ते तीन दिवस रेमडेसिवीर चा तुटवडा
रेमडेसिवीर

मुंबई -

रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे उत्पादक कंपन्यांकडून कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात आज बैठक पार पडली. याबाबत मंत्री शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, आपल्याला लागणारे रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज 12 हजार ते 15 हजार एवढे कमी मिळालेले असल्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. तसेच, माझी नुकतीच काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशाप्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? कारण साधरण तीन आठवड्यांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती.

त्यांनी मला त्यावेळेस पुढील 15 तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्राला 55 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवतील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. परंतू कालच्या तारखेपर्यंतची जर आपण सरासरी पाहिली, तर 37 ते 39 हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले आहेत.

ही सर्व आकडेवारी पाहता आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणारी वाढ पाहता तसेच रूग्णांना रेमडेसिवीर देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांची व माझी चर्चा झालेली आहे. हा पुरवठा 19-20 एप्रिल नंतर सुरळीत होईल, अशा प्रकारचे आश्‍वासन रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांनी दिले असल्याचेही डॉ. शिंगणे म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com