भाजपचे सरकार खोटारडे - अण्णा हजारे

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी एक दिवसाचे उपोषण
अण्णा हजारे
अण्णा हजारे

सुपा |वार्ताहर| Supa

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत.

त्यामुळे आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकर्‍यांनी सावध रहावे. हे आंदोलन मोडून काढले गेले तर पुन्हा होऊ शकणार नाही. त्यामुळे देशभरातील शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून सरकारचे नाक दाबावे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांना केले आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारे राळेगणसिध्दी येथे एक दिवसीय उपोषण करणार आहेत.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करताना हजारे यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंबंधी बोलताना हजारे म्हणाले, शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न सुटण्यासाठी त्यांच्या पिकांना हमी भाव मिळणे आवश्यक आहे.

त्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा मिळणे आवश्यक आहे. या मागणीसाठी आपण पूर्वीही आंदोलने केली आहेत. 2018 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर मोठे आंदोलन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले होते.

पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे 30 जानेवारी 2019 ला पुन्हा राळेगणसिद्धीमध्ये उपोषण केले. त्यावेळीही पंतप्रधान मोदी यांच्यापासून राज्यातील मुख्यमंत्र्यांपर्यंतची यंत्रणा धावून आली.

मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांचा ताफा घेऊन राळेगणसिद्धीत आले. पुन्हा तत्कालीन कृषी मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिले. मात्र, त्यावरही पुढे काहीच झाले नाही. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करणे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. मात्र, त्याकडे आजतागायत दुर्लक्ष करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना सावध करताना हजारे यांनी म्हटले आहे, या सरकारवर विश्वास ठेवू नका.

आता जे अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे, ते सुरू ठेवा. त्याला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरावे. एकदा का काही कारणांमुळे हे आंदोलन मोडून काढले गेले, तर ते पुन्हा होणे शक्य नाही, हे आपण आपल्या अनुभवावरून सांगतो आहोत. तसेच आजच्या बंदला पाठिंबा म्हणून राळेगणला एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे हजारे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com