1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी

व्यापारी महासंघाची मागणी
1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी
बंद

पुणे(प्रतिनिधि)

लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून व्यापाराचे जबर नुकसान होत आहे, असे महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे व्यापारी वर्ग आहे. राज्याच्या महसूलात व्यापारी वर्गाचं मोठं योगदान आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत हे क्षेत्र अडचणीत आले आहे. व्यापाऱ्यांच्या हाती काहीही उत्पन्न नसताना देखील त्यांनी दोन महिने कर्मचाऱ्यांचे पगार त्यांना दिले. मात्र आता आर्थिक अडचण भासू लागल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देणंही अशक्य झालं आहे. तर काम आणि उत्पन्न नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

या परिस्थितीत बेरोजगारी वाढत आहे. व्यापारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे 1 जूननंतर व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी द्यावी. बाजारपेठांवर बंदचे निर्बंध आणि ई-कॉमर्स कंपन्या परवानगी नसताना राजरोसपणे जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त वस्तूंचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची व सहकार्याची आवश्यकता आहे. सरकारने व्यापार्‍यांना तीन महिन्यांचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com