मुंबई | Mumbai

करोनाची लाट ओसारत नाही तेच राज्यावर आता बर्ड फ्लूचे संकट कोसळले आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं मत मांडलं आहे.

वाढदिवसानिमित्तानं जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. “देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारचे तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

'राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. याबाबत आधीच सर्व प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहे. पुढे काय करता येईल, काय नियोजन करायचे आहे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे', अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच, 'आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये लस कशी वितरीत केली जाईल यासंदर्भात चर्चा होईल', असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, परभणीत ज्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला तिथून भोवतालच्या एक किलोमीटरच्या पट्ट्यातील सर्व पक्ष्यांना ठार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला तिथून भोवतालच्या दहा किलोमीटरच्या पट्ट्यातील पक्षी, चिकन आणि अंडी यांची खरेदी-विक्री थांबवण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरात ११ कावळे मृतावस्थेत आढळले. तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये १८० पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत पक्ष्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या भागांमध्ये पक्षी मृतावस्थेत आढळले त्या भोवतालच्या दहा किलोमीटरच्या पट्ट्यातील पक्षी, चिकन आणि अंडी यांची खरेदी-विक्री थांबवण्यात आली आहे.

भारतात हिमाचल प्रदेश, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, केरळ या नऊ राज्यांमध्ये बर्ड फ्लू या संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू झाला. यात प्रामुख्याने कोंबड्या, कावळे, बदक, बगळे, टिटहरी तसेच काही स्थलांतरित पक्षी यांचा समावेश आहे. आतापर्यंत देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराचे अस्तित्व आढळले त्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांतील वन क्षेत्र, प्राणीसंग्रहालय या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लू आजाराची तीव्रता जास्त आहे अशा ठिकाणी पशूपक्ष्यांची खरेदी-विक्री थांबवण्यात आली आहे. तसेच संबंधित भागांतील सरकारी आणि खासगी कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिथे बर्ड फ्लू आजाराची तीव्रता जास्त आहे अशा भागांमध्ये अंडी आणि चिकन यांची विक्री थांबण्यात आली आहे.

विशिष्ट भागांत विशिष्ट पक्ष्यांमध्ये वेगाने बर्ड फ्लू पसरत असल्यास त्या भागातील संबंधित पक्ष्यांना वेगाने ठार मारुन जमीनीत पुरले जाते अथवा त्यांना ठार केल्यानंतर एकत्रित स्वरुपात जाळून नष्ट केले जाते. तसेच बर्ड फ्लू आजाराने मेलेल्या पक्ष्यांनाही जमीनीत पुरले जाते अथवा त्यांना एकत्रित स्वरुपात जाळून नष्ट केले जाते. हेच उपाय सध्या वापरले जात आहेत. पक्ष्यांना जमीनीत पुरले तर त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट रसायने आणि पावडर टाकून आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये याची काळजी घेतली जाते. भारतात प्रामुख्याने बर्ड फ्लू संकटावर उपाय म्हणून आजाराने मृत्यू झालेले पक्षी तसेच ठार केलेले पक्षी, नष्ट करायचे मांस आणि अंडी जाळण्याचा पर्याय निवडला जातो.