...तर राज्यात लॉकडाऊन; अजित पवारांचा इशारा

...तर राज्यात लॉकडाऊन; अजित पवारांचा इशारा

पुणे | Pune

जर महाराष्ट्रात ७०० मेट्रीक टनपेक्षा अधिक ऑक्सिजनची (Oxygen) मागणी निर्माण झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कठोर निर्णय घेऊ शकतात, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे...

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी सांगितलं की, करोनाबाबत राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. परंतु रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहे, बहुतेक जण घरीच उपचार घेत आहेत.

त्याबाबत केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकारचा (State Government) आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. परंतु, उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर मात्र मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या (Narendra Modi) बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सध्या भाजपाकडून टीका सुरू आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येक वेळेस बैठक घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहीले पाहिजे असे नाही. कधी कोणाला अडचण असते, कधी कोण करोनामुळे विलगीकरणात असते किंवा आणखी काही कारण असतात.

त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip walse-patil) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) जे नेहमी मुख्यमंत्र्यांसोबत अशा बैठकीस असतात. याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे संबंधित सल्लागार, सचिव अन्य महत्वाची लोक या बैठकीला हजर होते.

कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती की आपल्याकडे लस तुटवडा आहे, १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देताना लस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तशा पद्धतीची बैठकीत मागणी झाली. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही.

राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय व्यवस्थित सुरू आहे. आम्ही सगळेच जण त्यांचे सहकारी या नात्याने एक टीम म्हणून काम करत आहोत. अधिकारीदेखील काम करत आहेत. मुख्यमंत्रीदेखील दररोज आढावा घेत असल्याचेदेखील पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com