मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड - अजित पवार

मास्क बंधनकारक करणार
मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड - अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) | Pune -

नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यातील काही भागात अजूनही मास्कचा वापर केला जात नाही.

पुणे-पिंपरीचिंचवड आणि पुणे जिल्ह्यात मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्धाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी पवार बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर उषा ढोरे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकचे सत्ताधारी पक्षनेते आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, अव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.

पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुध्दची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना विरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याचादृष्टिने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे कोवीड-19 रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. कोरोना चाचण्यांचे मोठ्या प्रमाणात वाढवून चाचणीमध्ये लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह किंवा संस्थात्मक विलिनीकरण केले पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण आणता येईल. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com