कृषी सुधारणा विधेयक आणणार

- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
कृषी सुधारणा विधेयक आणणार

मुंबई |प्रतिनिधी

केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या दुरुस्त्या महाराष्ट्राला मान्य नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भरत घेऊन राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर सुमारे तासभर चर्चा केली.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारच्या कृषी कायद्याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्डवर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो. यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार? या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे.

शरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्यसरकारने सूचविलेल्या सुधारणांवर पवार यांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्याचे थोरात म्हणाले.

पीक विम्याच्या संदर्भात केंद्र सरकारची नियमावली देशभर लागू आहे. यावर्षी पीक विम्यात ५ हजार ८०० कोटी जमा झाले. शेतकर्‍यांना त्यातुन ८०० ते एक हजार कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळाले. खासगी विमा कंपन्यांना ५ हजार कोटी रुपयांचा नफा झाला. हे अन्यायकारक आहे या संदर्भात आम्ही वारंवार केंद्र सरकारबरोबर संपर्क केला आहे. मी स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटलो आहे, असे भुसे यांनी सांगितले.

कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. त्यासाठी आम्ही मसुद्यावर चर्चा करण्यासाठी सातत्याने एकत्र भेटत आहोत, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.याशिवाय केंद्र सरकारने सहकारी बँकेच्या अस्तित्वाला नख लावणारा कायदा केला आहे. या संदर्भातही शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. न्यायालयीन लढाई लढणे किंवा राज्याचा नवीन सहकार बँक हित संरक्षण कायदा करणे, या दोन पर्यायांवरही चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com