दोन वर्षानंतर एकनाथ महाराजांची पालखी पायी निघणार

४२२ वा आनंदसोहळा
दोन वर्षानंतर एकनाथ महाराजांची पालखी पायी निघणार

पैठण (प्रतिनिधी)

करोनाच्या संसर्गजन्य जागतिक महामारीमुळे २ वर्षे खंडित झालेली संत एकनाथांची 'आषाढी पायी दिंडी' यंदा २० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

संभाजीनगर, नगर, बीड, धाराशिव व सोलापूर या ५ जिल्ह्यांतून २८५ किलोमीटर पायी मार्गक्रमण करत हा आनंदसोहळा १९ दिवसांनंतर १० जुलैला पंढरीला पोहोचणार आहे. ४२२ व्या या आषाढी पालखी सोहळ्याची जोरदार पूर्वतयारी केली जात आहे. मराठवाड्यातील जवळपास ३५ हजार बारकरी पैठण येथून निघणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी होतात.

करोना महामारीमुळे २ वर्षांपासून वारीला मुकलेल्या वारकऱ्यांनी यंदा वारीच्या तयारीची लगबग सुरू केली आहे. करोना महामारीच्या काळात २०२० व २०२१ असे सलग २ वर्षे प्रशासनाने पायी वारी रद्द केली होती. या काळात परिवहन महामंडळाच्या बसने संत एकनाथांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. अचानक वारी खंडित झाल्याने वारकरी संप्रदाय निराश झाला होता.

यंदा मात्र पायी बारी होणार असल्याने वारकरी हरखून गेला आहे. परिणामी वारीतील वारकऱ्यांची संख्याही वाढणार आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत एकनाथ महाराज यांच्या पालख्यांना प्रस्थानत्रयी म्हणून आध्यात्मिक मान्यता आहे. राज्यभरातील वारकरी या पालख्यांमध्ये सहभागी होतात. पंढरपूरच्या आषाढी पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी २ महिने आधीपासून पूर्वतयारी केली जाते.

या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पैठण येथून २० जून रोजी सूर्यास्त समयी हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ वारकरी राजकीय पुढारी, व्यापारी, समाजसेवी संस्था - संघटना व दानशूर व्यक्ती यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा सोहळा पार पडतो.

पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण २४ जून रोजी दुपारी भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मिडसांगवी येथे, तर दुसरे रिंगण २८ जून रोजी दुपारी घुमरे पारगाव (ता . पाटोदा , जिल्हा बीड ) होणार आहे. तिसरे रिंगण १ जुलै दुपारी, ९ जुलै रोजी पादुकास्थान पंढरपूर येथे होणार आहे , अशी माहिती नाथवंशज तथा पालखीप्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांनी दिली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com