खरीप हंगामासाठी युरिया खताचा अतिरिक्त साठा

कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती
खरीप हंगामासाठी युरिया खताचा अतिरिक्त साठा

मुंबई | प्रतिनिधी

यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाभुसे यांनी बुधवारी दिली.

युरियाची एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचनाही भुसे यांनी केली.

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषीमंत्र्यांनी आज दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन दादा भुसे यांनी यावेळी केले

कृषी अधिकाऱ्यांनी वरीष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, असे भुसे यांनी सांगितले.

कंपन्यांनी खत पुवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे, त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावर्षी केंद्र सरकारकडून ४२ लाख ५० हजार मेट्रीक टन खत मंजूर केले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रीक टन साठा शिल्लक असून त्यामध्ये युरिया ५ लाख ३० हजार मेट्रीक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रीक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रीक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.

यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे आणि विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com