पुणे | प्रतिनिधी

ज्येष्ठ रंगकर्मी आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज ६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. आपल्या कारकिर्दित त्यांनी अनेक नावाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं.

हसतमुख चेहऱ्याने प्रत्येकाचे स्वागत करणारे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने संवाद साधणारे मोघे काही वर्षांपासून आजारी होते. व्याधींमुळे त्यांना व्हिलचेअरमधून फिरावे लागायचे.

अशाही परिस्थितीत नाउमेद न होता ते सभा सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावून वातावरण प्रफुल्लीत करायचे. शनिवारी त्यांनी कर्वे नगर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर वाडी येथे तर पुढील शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झालं .

वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा ही आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

त्यांच्या पश्चात पत्नी, अभिनेते शंतनू हे चिरंजीव आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. मोघे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत कवी सुधीर मोघे त्यांचे कनिष्ठ बंधू होत.