
अमरावती | Amravati
अमरावती येथील दर्यापूर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जे. डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने परतत असताना हा अपघात झालाय. विद्यार्थी हे ट्रॅक्टरने दर्यापूरच्या दिशेने येत असताना जेणपुर येथे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो तोल जाऊन पलटी झाला.
या अपघातात ट्रॅक्टर मधील सुमारे २५ ते ३० विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. सध्या पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.