मुक्ताईनगर येथे अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र

मुक्ताईनगर येथे अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Balvant Gaikwad

आशिया महामार्ग क्रमांक 46 वर सेक्युरिटी गार्ड म्हणून रस्त्याच्या कामावर असलेल्या आतेभाऊ-मामेभाऊ यांच्या अंगावरुन वाहन गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार दिल्याने दिवसभर तणावाचे वातावरण होते. दोन्ही मृत तरुण मुक्ताईनगर येथील संत रोहिदास नगरातील रहिवासी आहेत.

मुक्ताईनगर येथील पवन संजय जयकर (वय 18) व त्यांचा चुलत आत्याभाऊ ललित उर्फ छोटू आनंद तायडे  (वय 17) हे आठ महिन्यांपासून ब्लू स्टार सेक्युरिटी येथे सुरक्षा गार्ड म्हणून कामास होते.

दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता पवन जयकर व ललित तायडे यांचा ड्युटीच्या ठिकाणी अपघात झाला. पवन संजय जयकर व  ललित उर्फ छोटू आनंदा तायडे यांच्या डोक्यावरून वाहन गेले असल्याचे व वाहनाच्या टायरचे निशाण दिसत असल्याचे लक्षात आले. हे वाहन दोघांच्या डोक्यावरून व तोंडावरून गेल्याने दोघांच्या चेहर्‍याचा व डोक्याचा चेंदामेंदा झालेला दिसला . मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाहन मात्र तेथून निघून गेले होते. या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून पुलाच्या जवळ कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले दिसले नाही. तसेच काम करणार्‍यांना कंपनीतर्फे कोणतेही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केलेल्या नाहीत.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

दरम्यान सकाळी ही घटना समजता बरोबर सर्व समाज

बांधव व नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एकच गर्दी केली व त्या ठिकाणी संबंधित रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यात आली. आणि संबंधित रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत अपघातातील मृतांची प्रेत उचलू देणार नाहीत, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे तब्बल दोन तासानंतर म्हणजेच सकाळी 9.30 वाजता प्रेत उचलून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बोदवड चौफुली येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.  मृतदेह ताब्यात न घेण्याच्या अटीवर ठाम राहिले त्यामुळे मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बोदवड चौफुलीवर दुपारपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोठा जमाव होता आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कैलास भारसके निलेश सोळंके तसेच पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्ताईनगर येथील दीपक सुरेश जयकर (वय 37) यांनी फिर्याद दिली.

वरणगाव येथे चर्चा – दरम्यान रस्त्याच्या ठेकेदारास समोर चर्चेसाठी बोलाविण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु ठेकेदार मुक्ताईनगर येथे न आल्याने रस्त्याचे काम करणार्‍या कंपनीच्या वरणगाव येथील कार्यालयात अपघातातील मृतांचे नातेवाईक समाजबांधव गेले होते परंतु त्यानंतर काय चर्चा झाली? त्याबाबत माहिती समजू शकलेली नाही. घटनास्थळी मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांचेसह कार्यकर्ते यांनी धाव घेतली. तसेच अ‍ॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

Deshdoot
www.deshdoot.com