मराठा आरक्षण : ...अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही - मेटे

बीडमध्ये मोर्चा
विनायक मेटे
विनायक मेटे

बीड - येत्या 5 जुलैपर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पावसाळी अधिवेशन आम्ही होऊ देणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

बीडमध्ये शनिवारी विनायक मेटे याच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, राज्य सरकार मराठा समाजाला दुर्लक्षित करत आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे,

अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या(अशोक चव्हाण) मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केलीय. मराठा समाज्या मागण्यांव तातडीने अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने 3 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली. पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केलं नाही, अशी टीका करताना तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्‍नावर राज्याच्या राजकारणात खूप मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. विरोधकांनी सरकारला घेरलं असून मराठा संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. फडणवीस सरकारनं कायदा करून मराठा समाजाला देऊ केलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच राहणार

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारनं आपल्याला ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असे आवाहनही मेटे यांनी केले आहे. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहील. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभा राहतील, असे आवाहनही मेटे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com