वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण ; स्वयंघोषित ‘हभप’ बुवाला अटक

वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण ; स्वयंघोषित ‘हभप’ बुवाला अटक

कल्याण - 80 वर्षीय वयोवृद्ध पत्नीला लाथाबुक्क्या आणि प्लास्टिकच्या बादलीने अमानुषपणे मारहाण करणार्‍या 85 वर्षीय स्वयंघोषित ‘हभप’ गजानन बुवा चिकणकरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनीच आयपीसी कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत गजानन बुवा चिकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वृद्ध पतीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आठवड्याभरापूर्वीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनी कुटुंबाला समज दिली. त्यांनतर पोलिसांनी एक पथक आळंदीला रवाना केले होते. अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, ही घटना ही 31 मे रोजी घडली आहे. गजानन बुवाच्या 13 वर्षीय नातवाने संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे हा वृद्ध स्वत:ला हभप समजतो. पण स्वत:च्या पत्नीशी अत्यंत निघृणपणे वागतो. त्याची घरात दहशत असल्याने घरातील इतर महिला देखील त्याला मारहाण करण्यापासून रोखण्यासाठी पुढे आले नसल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे तर घरातील इतर सदस्य महिला मारहाण करताना तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत म्हणून त्यांच्यावरही सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन घरातील महिलांना जाब विचारला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com