८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक : आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक : आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के तर औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत.

या संदर्भात आरोग्य विभागाने मंगळवारी अधिसूचना काढली असून ती ३० जूनपर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.

राज्यात करोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्दैश उत्पादकांना देण्यात आले आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्यातील उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्प्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला ८० टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

ही अधिसूचना ३० जून २०२१ पर्यंत लागू राहणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com