६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सुरुवात

‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार -२०२२’ पं. उपेंद्र भट यांना प्रदान
६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सुरुवात

पुणे |प्रतिनिधी| Pune

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट यांच्या बहारदार गायनाने सुरवात झाली.

महोत्सवाच्या सुरवातीस कोविड काळात दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांनतर पंडित भट यांचे गायन झाले. त्यांनी राग मुलतानीमध्ये  ‘सोनी बलमा मोरे’ या बंदिशीद्वारे आपल्या गायनाची सुरवात केली. त्यांनतर ‘शाम अब तक न आए...’ बंदिश सादर केली. गंगाधर महाबंरे रचित पंडित भीमसेन जोशी यांच्या लोकप्रिय ‘बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग’ या अभंग सादरीकरणाद्वारे त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.  त्यांना हार्मोनियमवर निरंजन लेले, तबल्यासाठी  सचिन पावगी, तानपुऱ्यासाठी अनमोल थत्ते, देवव्रत भातखंडे व धनंजय भाटे,  सारंगीसाठी  फारुख लतीफ खान, पखवाज मनोज भांडवलकर, माऊली टाकळकर यांनी टाळसाठी  साथसंगत केली.

या सादरीकरणानंतर मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार -२०२२’ पं. उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीतात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंड, आनंद भाटे, मिलिंद देशपांडे, डॉ. प्रभाकर देशपांडे  पं. उपेंद्र भट यांच्या पत्नी मित्रविंदा भट आदी उपस्थित होते.

पुरस्काराबाबत बोलताना पं. भट म्हणाले, “ पुण्यात आलो त्यावेळी मला मराठी भाषेतले एक अक्षरही माहित नव्हते. मी जेव्हा पं. भीमसेन जोशी यांना याबद्दल बोललो त्यावेळी  पंडितजी म्हणाले, “ तुम्ही गाण उत्तम करा, इथली लोक तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही ’’ ते खरेच होते. इतक्या वर्षांत पुण्यातील नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आज मिळालेला हा पुरस्कार मी येथील नागरिकांना समर्पित करतो.

कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे नातेवाईक एस.जी.जोशी हे खास हुबळीहून प्रवास करून आले होते. त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्यावरील विशेष टपाल तिकीट श्रीनिवास जोशी यांना सुपूर्द केले. हे तिकीट शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे पाहण्यासाठी उपलब्ध राहिल. 

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे गायन झाले. त्यांनी राग मारवामध्ये तीलवाडा तालात पिया मोरे...हा विलंबित ख्याल आणि दृत एकताल मध्ये 'ओ गुनियन गाओ' ही बंदिश पेश केली. खमाज टप्पा हा गानप्रकर अतिशय तयारीने सादर केला.

त्यांना हार्मोनियमसाठी डॉ. मौसम, तबल्यासाठी भरत कामत यांनी व तानपुरासाठी स्वाती तिवारी आणि आकांक्षा ग्रोव्हर यांनी साथसंगत केली. 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com