अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मंत्री उदय सामंत यांची माहिती
अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मुंबई | Mumbai

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे २०२१ पासून लस दिली जाणार असून यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि. १ मे २०२१ पासून होणार आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोनाबाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com