तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींचे पॅकेज

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींचे पॅकेज

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे निकष बाजूला सारून वाढीव मदत देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार वादळग्रस्तांसाठी २५२ कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.

केंद्र सरकारने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य सरकारच्या निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.

एनडीआरएफच्या निकषानुसार वादळग्रस्तांसाठी ७२ कोटी रुपयांची मदत देय होती. मात्र, राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून १८० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत

* नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या घरांना दीड लाख रुपये

* अंशतः पडझड झालेल्या घरांना १५ हजार ते ५० हजारापर्यंत मदत

* भांडी आणि कपड्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये

* बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपये, दोन हेक्टर मर्यादेत मदत मिळणार

* नारळ झाडासाठी २५० रुपये प्रति झाड, सुपारी झाडासाठी ५० रुपये प्रति झाड. दोन हेक्टरच्या मर्यादेत.

* दुकानदार आणि टपरीधारक जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत

मत्सव्यवसायिकांचे नुकसान

बोटींची अंशत: दुरूस्तीसाठी १० हजार रुपये
पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी २५ हजार रुपये, अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी आणि पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये

* तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ४ लाख रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त एक लाख अशी एकूण पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल.

* नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये इतकी मदत देण्यात येईल.


* चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना २६ ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य आणि केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com