पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे तब्बल २२ कोटी २५ लाखांच्या जुन्या नोटा पडून

नोटा बदलून देण्यास आरबीआयचा नकार
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे तब्बल २२ कोटी २५ लाखांच्या जुन्या नोटा पडून

पुणे(प्रतिनिधी)-

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे (PDCC) तब्बल 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही पडून आहेत. दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पीडीसीसी बँकेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबर, 2016 मध्ये एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय चलनातून बाद केल्या. यानंतर चलनी नोटा या मूल्यहीन झाल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल तब्बल 576 कोटी रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने बॅंकेतच पडून होत्या. अनेक प्रयत्नांनंतर यापैकी 554 कोटी रुपयांच्या नोटा बदलून मिळाल्या. याच नोटांपैकी शिल्लक असलेल्या 22 कोटी 25 लाख रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बॅंकेला बदलून मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

करोनामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल बाकी राहिला आहे. यामुळे जिल्हा बॅंकेस जुन्या नोटा चक्क लॉकरमध्ये ठेवाव्या लागल्या आहेत. या नोटांचा वाळवी व अन्य किडीपासून बचाव केला जात आहे. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर, 2016 ला एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 नोव्हेंबरला सर्व बॅंकांना सुटी देण्यात आली. या सुटीमुळे 9 नोव्हेंबरला जमा झालेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बॅंकेचे अधिकारी 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये या नोटा जमा करण्यासाठी गेले. पण, आमच्याकडे जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत या बॅंकांनी हे पैसे जमा करून घेतले नाहीत. तसे त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या पत्राच्या आधारे बॅंकेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मात्र. कोरोनामुळे अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी या निर्णयापर्यंत या जुन्या नोटा सुस्थितीत जपून ठेवण्याचे आव्हान जिल्हा बॅंकेसमोर आहे. रिझर्व्ह बँकेने 22 कोटी 25 लाख रुपयांच्या नोटा नष्ट करण्याचे पत्र दिले होते. या पत्राविरोधात बँक सर्वोच्च न्यायलयात गेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com