पुण्यात म्युकर मायकोसिसमुळे 20 जणांचा मृत्यू

पुण्यात म्युकर मायकोसिसमुळे 20 जणांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधि) - कोरोनाने थैमान घातले आहे. उपचार सुरू असताना अनेकांचे बळी कोविड-19 या विषाणूने घेतले आहे. कोरोनाबाधित रुग्णाला या विषणूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोविड19 च्या विळख्यातून सुटका झाली तरी दुसरे संकट या रुग्णांसमोर याअ वासून उभे आहे. ते म्हणजे ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराचे. हेही संकट भयानक असल्याचा प्रत्यय पुण्यात येत आहे. कोरोनासाठी दोन्ही लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे आता ‘म्युकर मायकोसिस’साठीही हॉटस्पॉट ठरले आहे. पुण्यात आत्तापर्यंत या आजाराने 20 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं असून रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे म्युकर मायकोसिसच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात आतापर्यंत 318 जणांना ‘म्युकर मायकोसिसची’ लागण झाली असून 20 जणांचा बळी गेला आहे. त्याशिवाय आतापर्यंत 1257 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा झाली आहे. राज्यातही म्युकर मायकोसिसचा प्रकोप वाढू नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्याचं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.

पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

ससूनमध्ये स्वतंत्र वार्ड

दरम्यान, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर ससून रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आला आहे. 50 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णासाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com