राज्यात 1012 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप : 106.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

साखर कारखान्यांचे इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य
राज्यात 1012 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप  : 106.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पुणे (प्रतिनिधि) - राज्यातील उस गाळप हंगाम संपला आहे. यंदा राज्यात 11.48 हेक्टर एवढे उसाखालील क्षेत्र असतानाही पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर गाळप हंगाम संपला आहे. विशेष म्हणजे सन 2018-19 नंतर यंदा सरासरी 140 दिवस हा हंगाम चालला. दरम्यान, राज्यातील सहकारी आणि खाजगी अशा 190 साखर कारखान्यांनी उसाचे गाळप घेतले. यंदाच्या गाळप हंगामात एकूण 1012 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून 106.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाचा साखरेचा सरासरी उतारा 10.50 इतका मिळाला आहे. विशेष साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, यंदा 95 सहकारी आणि 95 खाजगी साखर कारखान्यांनी गाळप घेतले. प्रतिदिन 7 लाख 28 हजार 480 गाळप क्षमतेने हे गाळप घेण्यात आले.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट असतानाही 10 लाख उस तोडणी कामगारांपैकी कोणालाही कोरोनाची बाधा न होता ते सुखरूप त्यांच्या घरी गेले.

साखर कारखान्यांचा इथेनॉल उत्पादनावर भर

मागील शिल्लक असलेला साखरेचा साठा आणि यंदाचे साखर उत्पादन यामुळे साखर गोदामामध्ये पडून आहे. साखरेला बाजारात उठाव नाही. त्यामुळे साखर कारखान्यांनी आता इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. महाराष्ट्राची वाटचाल ही आता ब्राझीलच्या दिशेने सुरू असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.

बँकां आणि वित्त संस्थांकडून सहज मिळणारे अर्थसहाय्य,तसेच 21 दिवसांनी वेळेवर मिळणारे इथेनॉलचे पेमेंट यामुळे सहकारी, खाजगी आणि स्वतंत्र कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे वळले आहेत. इथेनॉलचे पैसे वेळेवर मिळत असल्याने साखर विकली गेली नाही तरी किमान आधारभूत किंमतीची (एफआरपी) शेतकऱ्यांना देणे असलेली 93 टक्के रक्कम कारखान्यांना देता आली असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इथेनॉलचे उत्पादन घेतल्याने साखरेच्या उताऱ्यात 1 ते 1.25 टक्के घट झाली आहे. मात्र, त्याचे तज्ञांकडून त्याच्या पैशांची आकडेमोड करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देण्यात येतील असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांचा साखरेचा रस इथेनॉल उत्पादनासाठी वर्ग करण्यावर इथून पुढे भर असणार आहे. त्यामुळे येत्या 3 ते 4 वर्षात साखरेचा साठा कमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत इथेनॉलचे उत्पादन घेणारा देश म्हणून ओळखला जाईल.

एफआरपी थकविणाऱ्या 29 कारखान्यांवर कारवाई

यंदा इथेनॉलचे पैसे कारखान्यांना वेळेवर मिळाले त्यामुळे 93 टक्के एफआरपीचे पैसे उस उत्पादक शेतकाऱ्यांना अदा करण्यात आले. राज्यातील काही कारखान्यांकडे 1400 कोटीची एफआरपीची थकबाकी असून त्याचे प्रमाण 6.5 टक्के इतके आहे.दरम्यान, येत्या 2 दिवसांत काही कारखाने 700 ते 800 कोटी रुपयांची एफआरपी अदा करणार आहेत तर 29 कारखान्यांवर 656 कोटी एफआरपी थकीत प्रकरणी साखर उत्पादन प्रमाणपत्रनुसार (आरआरसी) कारवाई करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

25 कारखाने ऑक्सीजनचे उत्पादन घेणार

जेष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यासंदर्भात सूचना केली होती. त्यानुसार 25 कारखान्यांनी तयारी केली असून 19 कारखान्यांनी तैवान येथील कंपनीला रेडिमेड ऑक्सीजन प्रकल्पासाठी पैसे भरले आहेत. येत्या महिन्याभरात हे तयार परकल्प येतील असे गायकवाड यांनी सांगितले.

ऊस तोडणी कामगारांना करोनाची बाधा नाही

राज्यात करोनाची दुसरी लाट असून कित्येकांचा मृत्यू झाला आहे. त्यात लाखो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे 10 लाख ऊस तोडणी कामगारांपैकी कोणालाही करोनाची बाधा न होता ते सुखरूप त्यांच्या घरी गेले, असेही गायकवाड यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ

नगर जिल्ह्यातील 23 साखर करखान्यांपैकी 10 कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यात नेवाशातील ज्ञानेश्वर, प्रवरेचा पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, संगमनेरातील सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात, शेवगावातील गंगामाई, श्रीरामपुरातील अशोक, कर्जतमधील अंबालिका, श्रीगोंद्यातील साईकृपा, कोपरगावातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (संजीवनी), राहुरीतील डॉ. तनपुरे, कोळपेवाडी कर्मवीर शंकरराव काळे (कोसाका) या कारखान्यांचा समावेश आहे. साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार इथेनॉल निर्मितीमुळे उतार्‍यात घट झाली. त्याची जुळवाजुळव करून पैसे मिळणार असतील तर त्याचा फायदा या कारखान्यांच्या हजारो सभासदांना होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com