पुरातत्व खात्याला हवाय अजिंठा, वेरूळ अभ्यागत केंद्रांचा ताबा

इंटरप्रिटीशन सेंटरची तयारी
पुरातत्व खात्याला हवाय अजिंठा, वेरूळ अभ्यागत केंद्रांचा ताबा

औरंगाबाद - aurangabad

केंद्र शासनाच्या (Central government) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याला (एएसआय) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (Maharashtra Tourism Development Corporation) उभारलेल्या अजिंठा आणि वेरूळ (Ajanta and Ellora) येथील अभ्यागत केंद्राचा ताबा हवा आहे. दोन्ही अभ्यागत केंद्र तोट्यात असून वर्षाेनवर्षे बंद आहेत. पुरातत्व खात्याला तेथे इंटरप्रिटीशन सेंटर (Interpretation Center) आणि आर्ट गॅलरी (Art gallery) सुरू करायची आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. राज्याकडून मात्र अजून प्रतिसाद मिळालेला नाही.

पर्यटन विकास महामंडळाने अजिंठा आणि वेरूळ लेणीच्या पायथ्याशी अभ्यागत केंद्र उभारले आहेत. जपान सरकारच्या जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प साकारला आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये सेंटर सुरू झाले. मात्र, सुरूवातीपासून ते तोट्यात आहेत. नुकसान एवढे वाढले की वीज बील, पाणीपट्टी, देखभाल आणि मणुष्यबळासाठी वर्षाकाठी लागणारे ५ कोटी रूपये नसल्याने ते २०१७ पासून बंद ठेवावे लागले. हे सेंटर ताब्यात घेण्यासाठी पुरातत्व खात्याचे अधिक्षण पुरातत्वविद् डॉ.मिलनकुमार चावले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

डॉ.चावले म्हणाले, निरीच्या अहवालात लेणीला अत्याधिक पर्यटकांचा धोका वर्तविण्यात आला होता. यातून १९८५-८६ मध्ये व्हिजीटर सेंटरची संकल्पना समोर आली. लेणीत नेमके काय बघायचे, ते पर्यटकांना येथे समजेल. यामुळे प्रत्यक्ष लेणीतील पर्यटक संख्येवर लगाम लागेल असा विचार होता. एमटीडीसीने सेंटर बांधून एएसआयला हस्तांतरीत करणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात २०१३ मध्ये सेंटर सुरू झाले. तोपर्यंत प्रकल्पांशी संबंधीत काही अधिकारी निवृत्त तर काहींची बदली झाली. नवीन अधिकाऱ्यांना हस्तांतराचा मुद्दा माहिती नसल्याने आजची परिस्थिती उदभवली.

इंटरप्रिटीशन सेंटर उभारणार

एएसआयला व्हिजीटर सेंटरमध्ये इंटरप्रिटीशन सेंटर उभारायचे आहे. अजिंठा लेणींमध्ये चित्रांतून ५४७ जातककथा मांडल्या आहेत. त्यातील १५-२० चित्रे वगळता उर्वरीत धूसर झाले आहेत. यामुळे पर्यटक, संशोधक, अभ्यासक, इतिहासप्रेमींना चित्रातील आशय समजण्यास त्रास होतो. एएसआच्या कलाकारांनी लेणीतील प्रसंगांच्या १४ भव्य पेंटीग्ज काढल्या आहेत. तर औरंगाबादचे चित्रकार दिवंगत एम.आर. पिंपरे यांनी ५५ वर्षे धुसर झालेल्या ३५० चित्रांना कॅनव्हसवर ठळक करण्याचे काम केले. या चित्रांची आर्ट गॅलरी उभारण्यासाठी डॉ.चावले प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना व्हिजीटर सेंटर ताब्यात हवे आहे.

पर्यटन मंत्री सकारात्मक

व्हिजीटर सेंटर राज्याने बांधले असले तरी ते नंतर एएसआयला हस्तांतरीत करण्याचे नियोजन होते. अधिकारी बदलल्याने हा विषय मागे पडला. याबाबत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. ते यासाठी सकारात्मक दिसले. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

- डॉ.मिलनकुमार चावले, अधिक्षण पुरातत्वविद्, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग

Related Stories

No stories found.