Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedशिस्त न पाळल्यास लॉकडाऊन करावा लागेल- ना. थोरात

शिस्त न पाळल्यास लॉकडाऊन करावा लागेल- ना. थोरात

संगमनेर | प्रतिनिधी | Sangmner

तालुक्यात व राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक बाब आहे. परंतु बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. तालुका करोनामुक्त होण्यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाणे टाळावे, लग्न समारंभ, वाढदिवस, अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर ही करोनाची साखळी आपण तोडू शकतो.

- Advertisement -

करोना संपविण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. परंतु नागरिकांनी शिस्त न पाळल्यास लॉकडाऊन करावा लागेल असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शॅम्प्रो येथे झालेल्या करोना उपाययोजना बाबतच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्षल तांबे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार थोरात म्हणाले, करोना हे मानवजातीवरील संकट आहे. मागील चार महिन्यांपासून सर्व प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, असोसिएशन, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सहकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, महसूल विभाग, आशा स्वयंसेविका यांनी खूप चांगले काम केले. मात्र काही ठिकाणी होणारे लग्न समारंभ, बाहेरून आलेले पाहुणे, भाजीबाजार, गर्दी, अनावश्यक घराबाहेर पडणे नियम न पाळणे अशा विविध बाबींमुळे करोना रुग्णांची वाढ होत आहे.

आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. भाजी बाजारातील व दुकानातील गर्दी ठिकाणी सर्वांनी सतर्कता बाळगावी. सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर केला पाहिजे. सध्या संगमनेरमध्ये 115 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यातील 113 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. तसेच आतापर्यंत 2440 लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सरकारी व खाजगी कोव्हिड टेस्टिंग करणारा संगमनेर हा जिल्ह्यातील पहिला तालुका ठरला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरूच राहणार आहे. तसेच घुलेवाडी येथील कोव्हिड रुग्णालयाची क्षमता वाढून 90 बेडची केली आहे. मौलाना आझाद मंगल कार्यालय व नगरपालिकेचे कॉटेज हॉस्पिटल येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कुरण येथे तातडीने कोव्हिड सेंटर सुरू केले असून, तालुक्यात कोव्हिड सेंटरची क्षमता 500 बेडची केली आहे.

तालुक्यात रॅपिड टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन सर्वतोपरी आपले काम करत आहे. याला नागरिकांची साथ आवश्यक आहे. मात्र नियम न पाळल्यास प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांनी सहकार्य केले नाही तर नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागू शकतो ,असेही ते म्हणाले.

करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत ना. थोरात यांनी संगमनेरमध्ये प्रशासन, कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स यांसह विविध सेवाभावी संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. शहरात व प्रत्येक गावात जनजागृती करुन नागरिकांमध्ये शिस्त वाढावी यासाठी काम करावे अशा सूचनाही ना. थोरात यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या