सायंकाळी चारनंतर औरंगाबादेत सामसूम

पोलीस यंत्रणा रस्त्यावर
सायंकाळी चारनंतर औरंगाबादेत सामसूम

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेतून सावरत नाहीत, तोच पुन्हा एकदा डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिसर्‍या लाटेचा संभावित धोका निर्माण झाला आहे. राज्यात डेल्टा प्लस (Delta Plus) विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढल्याने सरकारने पुन्हा निर्बंध लादले आहेत. शहरात चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी जारी केले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी दुपारी चारच्या ठोक्याला रस्त्यावर उतरून व्यापा-यांना आस्थापना बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी वाहनधारकांची देखील कसून चौकशी करण्यात आली.

डेल्टा प्लस (Delta Plus) या विषाणूच्या नव्या प्रकाराने सध्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. दुसर्‍या लाटेच्या काळात सुमारे तीन महिने कडक निर्बंध घालण्यात आले होते. निर्बंध उठवून महिना उलटत नाही, तोच पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्गासह कष्टक-यांच्या चिंतेत भर पडली आहे. हातावर पोट भरणा-या कुटुंबाना रोजगाराची चिंता आहे. तर दुसरीकडे वाढती गुन्हेगारी रोखण्यासोबत आता निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा (Police) पोलीस दल रस्त्यावर उतरले आहे. पुंडलिकनगर, सिटीचौक, जवाहरनगर, क्रांतीचौक, सातारा, बेगमपुरा, मुकुंदवाडी, छावणी, उस्मानपुरा, जिन्सी, बेगमपुरा, दौलताबाद, एमआयडीसी सिडको, सिडको, वेदांतनगर, चिकलठाणा आदी पोलीस ठाण्याचे प्रभारी स्वत: रस्त्यावर उतरून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करताना दिसून आले. दुपारी चार वाजण्यापुर्वीच पोलिसांची वाहने रस्त्यावर उतरली. भोंग्याव्दारे पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद करण्याचे आवाहन केले. तसेच प्रभारींनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्तीला सुरूवात केली होती. अनावश्यक फिरणा-यांना घरात राहण्याच्या सूचना देखील पोलिसांकडून देण्यात येत होत्या. तर चौका-चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com