औरंगाबादेत लायपोझोमल ऍम्फोटेरिसिन बी' औषधांचा तुटवडा

औषधीविना रुग्णांचे हाल
औरंगाबादेत लायपोझोमल ऍम्फोटेरिसिन बी'  औषधांचा तुटवडा

औरंगाबाद - Aurangabad

म्युकरमायकॉसिस या बुरशीजन्य घातक आजारावरील अतिशय महत्त्वाच्या 'लायपोझोमल ऍम्फोटेरिसिन बी'सह 'लिपिड कॉम्प्लेक्स ऍम्फोटेरिसिन बी' या औषधांचा गंभीर तुटवडा कायम असून, घाटीसह सर्वच खासगी रुग्णालयांतील रुग्णांचे या औषधीविना हाल होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे रुग्णसंख्या लक्षणीय असताना, महत्त्वाची औषधी मिळत नसल्याची वस्तुस्थिती कायम आहे आणि पुन्हा ही औषधी मिळण्यासाठी शासकीय-प्रशासकीय पातळीवर ठोस हालचाली होत नसल्याचेही दिसून येत आहे.

मागच्या एक ते दीड महिन्यापासून करोना पश्चात रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिस हा घातक आजार लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. या आजारामध्ये तातडीच्या शस्त्रक्रियेबरोबरच औषधोपचारांनाही निर्विवाद महत्व आहे. मात्र, मागच्या काही आठवड्यांपासून या आजारावरील सर्वांत प्रभावी 'लायपोझोमल ऍम्फोटेरिसिन बी' या औषधाचा गंभीर तुटवडा आहे.

तसेच या औषधाची किंमतही केवळ महिन्याभरात दुपटीने वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. केवळ महिन्या-दीड महिन्यापूर्वी हेच इंजेक्शन अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये उपलब्ध होत होते. मात्र आता सात ते साडेसात हजार रुपये मोजूनही मिळत नसल्याची स्थिती आहे. त्या खालोखाल महत्त्व असलेल्या 'लिपिड कॉम्प्लेक्स ऍम्फोटेरिसिन बी' या औषधाचाही आता तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या 'कन्व्हेश्नल ऍम्फोटेरिसिन बी' या औषधाचा वापर केला जात आहे. मात्र त्याचे दुष्परिणाम जास्त असल्यामुळे 'कन्व्हेश्नल' प्रकारातील औषधाचा जपून व मर्यादित वापर करण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळेही रुग्णांमध्ये इतर गुंतागुंत व रुग्णालयातील वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com