वृद्धाचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप

प्रत्येकी २० हजाराचा दंड
वृद्धाचा खून करणाऱ्या तिघांना जन्मठेप

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


गाडी अंगावर घातल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करून खून (murder) केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांसह मित्राला जन्मठेप आणि प्रत्येकी २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. कोचे यांनी ठोठावली. शेख सादीक ऊर्फ मुन्ना जान मोहम्मद (२८), जावेदशेख जान मोहम्मद (३२, दोघे रा. मठ मोहल्ला, अजिंठा ता. सिल्लोड) आणि अथर ऊर्फ अत्तु बेग जाफर (३८, रा. धोबी गल्ली, अजिंठा ता. सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत. 

विशेष म्हणजे गुन्ह्यात तिघा आरोपींपैकी एकाने वृद्धाला लाकडी दांड्याने मारहाण केली, मात्र गुन्ह्यात इतर दोघा आरोपींचाही तेवढाच सहभाग असल्याने तेदेखील या खूनाला जबाबदार असल्याचे सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शेख मोहम्मद सौफीयान मोहम्मद शफियोद्दीन उमर (२३, रा. अजिंठा ता. सिल्लोड) याने फिर्याद दिली होती. त्यानूसार, २६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीचे वडील तथा मयत मोहम्मद शफियोद्दी (४५) हे गल्लीत उभे असताना आरोपी शेख सादीक ऊर्फ मुन्ना याने त्याचे ओमनी बाहन त्यांच्या अंगावर घालून जखमी करण्याचा प्रयत्न केला. शफियोदी यांनी याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करून बाचाबाची सुरू केली.

उपस्थित लोकांनी त्यांची भांडण सोडवली होती. घटनेच्या २०-२५ मिनिटांनी शफियोद्दी हे भावासह गप्पा मारत उभे असताना आरोपी शेख सादीक हा त्याचा भाऊ जावेद शेख आणि मीत्र अथर ऊर्फ अत्तु असे तेथे आले. जावेद शेख आणि अथर ऊर्फ अत्तु या दोघांनी सौफीयान यांना शिवीगाळ सुरू केली. तर शेख सादीक याने हातातील लाकडी दांड्याने शफियोद्दी यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. शफियोद्दी यांना उपचारासाठी अजिंठा येथील सरकारी रुग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणात अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

प्रकरणात तपास अधिकारी अजित विसपुते यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी २० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अँड. बांगर यांना अँड. अभिमान करपे यांनी सहाय्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com