तब्बल 51 वर्षानंतर गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे अस्तित्व!

३७५ किलोमीटर अंतरावरून आल्याची शक्यता 
तब्बल 51 वर्षानंतर गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे अस्तित्व!

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे अस्तित्व असल्याच्या खाणाखुणा नुकत्याच हाती आल्या आहेत. 1940 साली पट्टेदार वाघाचे दर्शन गौताळ्यात होते. त्यांनतर तब्बल 51 वर्षानंतर येथे पुन्हा एकदा वाघ दिसून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात तो कैद झाला असून, सद्यस्थिती तो गौताळ्यातच वास्तव्यास असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे 375 किलोमीटरचे अंतर पार करून तो गौताळ्यात दाखल झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात त्याच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. गौताळ्यात यापूर्वी 1940 साली व त्यानंतर 1970 साली वाघाचे अखेरचे दर्शन झाले होते. अभयारण्यात बिबटे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, पट्टेदार वाघ नव्हते. तो आता दिसला असल्याने निसर्गतज्ज्ञामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा वाघ वयात आलेला नर असल्याचे म्हटले जात आहे. तरुण असल्याने तो भटकत येथे आला असण्याची शक्यता मानद वन्यजीव संरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा वाघ यवतमाळचे पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाण्याचे ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव आणि गौताळा असा सुमारे 375 किलोमीटरचा प्रवास करत येथे दाखल झाला. मात्र, या मार्गावर तो कुठेही कसा दिसला नाही, याबाबत डॉ. पाठक यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. हा वाघ तरुण नर असल्याने मादीच्या शोधात मोठे अंतर पार करून येथे आला आहे. त्यामुळे लवकरच मादी वाघीण आणि त्याची भेट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गौताळ्यात वाघांची उत्पत्ती वाढू शकते. असे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले आहे. गौताळ्यात 5 ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून, याद्वारे त्याची हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे.

गौताळ्यात ठिकठिकाणी या तरुण नर वाघाच्या पंज्याचे ठसे, विष्ठा तज्ज्ञाना दिसून आली आहे. डॉ. किशोर पाठक यांच्यासहित वन्यजीवप्रेमी मिलींद गिरधारी, वसीम कादरी आणि पहिल्यांदा वाघ बघणारे वनसेवक रमेश घुगे यांनी रविवारी वाघाच्या शोधार्थ मोहिम राबवली. त्यात नुकतेच एका नीलगायीचा फडशा पाडल्याचे दिसून आले. यावरून तो अद्याप गौताळ्यातच असल्याची शक्यता डॉ. पाठक यांनी वर्तवली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com