शहरातील 57 हजार पथदिव्यांवर एलईडी लाईट 

66 टक्के विजेची बचत
शहरातील 57 हजार पथदिव्यांवर एलईडी लाईट 

औरंगाबाद - Aurangabad

आझाद चौक ते श्रीराम मंदिर हा रस्ता महापालिकेने दीडशे वॉट लाईट फिटिंग लावून उजळून टाकला आहे. या रस्त्यावर पूर्वी पाचशे वॉटचे फिटिंग लावण्यात आले होते. ते काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे 66 टक्के विजेची बचत झाल्याचा दावा पालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे शहरातील सर्व पथदिव्यांवर एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. सुरुवातीला चाळीस हजार पथदिव्यांवर एलईडी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. काम पूर्ण झाल्यावर आणखी अठरा हजार पथदिव्यांवर एलईडी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि हे कामदेखील पूर्ण करण्यात आले. त्यामुळे शहरातील 57 हजार पथदिव्यांवर एलईडी लावण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक प्रमुख रस्ते उजळून निघाले. एलईडी लावल्यामुळे पालिकेच्या वीज बिलात देखील मोठी बचत झाली. पथदिव्यांचे महिन्याला सुमारे दीड कोटी रुपये विजेचे बिल यायचे, आता ते 75 ते 80 लाखांपर्यंत आल्याचे सांगितले जाते.

आझाद चौक ते श्रीराम मंदिर या सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावर सुलतान पोलवर पाचशे वॉटचे दिवे लावण्यात आले होते. अडीचशे-अडीचशे वॉटचे दोन दिवे एका पोलवर लावण्यात आले होते. अडीचशे वॉटचे दिवे काढून त्या जागी 75-75 वॉटचे दोन दिवे (एकूण 150 वॉट) लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी विद्युत विभागाच्या उप अभियंता मोहिनी गायकवाड यांनी स्थळ पाहणी केली. कमी वॉटचे दिवे लावल्यावर रस्त्यावर प्रकाश कसा पडेल, याचा अभ्यास केला, अशी माहिती या विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख यांनी दिली. 150 वॉटचे दिवे लावल्यावर पाचशे वॉटच्या दिव्यांइतकाच प्रकाश पडेल असे लक्षात आल्यावर आठ दिवसांपूर्वी आझाद चौक ते श्री राम मंदिरापर्यंतच्या रस्त्यावरील विजेच्या खांबावरील फिटिंग बदलण्यात आले. आता सर्वच खांबांवर 150 वॉटचे फिटिंग आहे. यामुळे संपूर्ण रस्ता उजळून निघाला असून, कुणाचीही तक्रार नसल्याचे देशमुख यांनी नमूद केले. पाचशे वॉटचे फिटिंग बदलून त्या जागी दीडशे वॉटचे फिटिंग लावल्यामुळे वीज वापरात 66 टक्के बचत झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com