
औरंगाबाद - aurangabad
आपण सर्वसामान्य आहोत आणि त्याप्रमाणे आपले जीवनही सामान्यच आहे. त्यामुळे भावना, राग, निराशा, दुःख, आनंद, नकार पचवता आलाच पाहिजे. अनेकांना सगळंंच कसं चांगल हवं आणि या भावनेतून जर एखादी गोष्ट मिळाली नाही तर आत्महत्येचा मार्ग जवळचा वाटतो. हल्ली राजकीय स्थितीतून होेणाऱ्या आत्महत्या, स्टेटस ठेवून आत्महत्या, प्रेमातील आत्महत्या, धडा शिकविण्यासाठी करण्यात येणाऱ्या आत्महत्या वाढत आहेत. ही बाब दुर्दैवी असली तरी आत्महत्या या कायमच थांबवता येतील असे होणार नाही. परंतु, जगताना वाटेत येणारे खड्डे, अडथळे स्वीकारून जगायला शिकणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. रचना पोळ यांनी व्यक्त केले.
सजग महिला संघर्ष समितीच्या वतीने आज शहरातील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात 'वाढते आत्महत्येचे प्रमाण' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ. रचना पोळ यांनी आत्महत्येच्या कारणमीमांसा केली. त्या म्हणाल्या, आत्महत्या कोणीही, कधीही करू शकतो, त्यामागे श्रीमंत, गरीब असा कुठलाही भेद नसतो. ज्याच्याकडे सामाजिकदृष्ट्या सगळ आहे तो पण करतो अथवा आता हसतमुख असलेला माणूस दुसऱ्या क्षणी जीवन संपवतो. यामागे वेगवेगळी कारणे असतात. हात तुटला तर बोलून चालेल का,औषधेच काम करतील तसेच समुपदेशाने हे सर्व प्रश्न मिटत नाही अशा भावना मनात आल्या तर तर त्याला औषधोपचार घेणे हे सुद्धा महत्त्वाचेआहे. परंतु, आपल्याकडे मानसोपचार फक्त वेडी माणसे घेतात हा गैरसमज असल्याने आपण त्याला विकार म्हणून स्वीकारत नाही ही खंत डॉ. पोळ यांनी व्यक्त केली.