Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedलातूरमध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस

लातूरमध्ये पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस

औरंगाबाद – aurangabad

लातूर शहर महानगरपालिका (Latur Municipal Corporation) यांच्या पुढाकाराने अशोका कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या घरगुती गॅस लाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख (Guardian Minister Amit Deshmukh) यांच्या हस्ते पार पडला. अशाप्रकारे पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस (gas) पोचवणारे लातूर हे मराठवाड्यातील पहिले तर राज्यातील केवळ सातवे शहर ठरणार आहे. घरगुती गॅस सोबतच आता गॅसवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, असे मत पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

अशोका गॅस कंपनीच्या वतीने शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. राजीव गांधी चौक येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्षनेते दीपक सुळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ड. किरण जाधव, नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, रविशंकर जाधव, आयुब मणियार, सचिन मस्के यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सचिव गोरोबा लोखंडे, संजय निलेगावकर, कंपनीचे प्रकल्प समन्वयक शैलेश नखाते यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले की,जे जे नवं ते लातुरला हवं हे स्व. विलासराव देशमुख यांचे वाक्य आता ब्रीदवाक्य झाले आहे. सोलापूर, नांदेडच्या अगोदर लातुरात मोबाईल सुरू झाला होता. पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याचेही तसेच आहे. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतो. शहरातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी मनपाने कोणालाही अभिप्रेत नसणारे पाऊल उचलले आहे. यामुळे महागाईच्या काळात सामान्य नागरिकांचे पैसे वाचणार आहेत. मनपाने शहरातील प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस उपलब्ध होण्याची व्यवस्था करावी. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहरालगतच्या गावातही गॅस पुरवठा करता यावा, याचा आराखडा तयार करावा. गॅस बेस इंडस्ट्री लातूरात येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

स्व.विलासराव देशमुख यांनी शासकीय रुग्णालयाचा कायापालट केला. या रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करून खाटांची संख्या 300 वरून 1200 पर्यंत नेली. त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळू शकला. शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्या, यासाठी गाव भागात नवे रुग्णालय बांधले जाणार आहे. मनपाकडे डॉक्टरांची कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी शहर दत्तक घेऊन डॉक्टर उपलब्ध करून देऊ. शहराप्रती असणार्‍या उत्तरदायित्वामुळे गल्लीबोळातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

प्रास्ताविक करताना महापौर गोजमगुंडे यांनी लातूरचा विकासाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. स्व. विलासराव देशमुख यांचे स्वप्न अमित देशमुख पूर्ण करत आहेत. स्व. देशमुख यांनी विकासाचे मंदिर बांधले. त्याच्यावर कळस चढविण्याचे काम अमित देशमुख करत आहेत. पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणारे लातूर हे मराठवाड्यातील पहिले तर राज्यातील केवळ सातवे शहर आहे. यामुळे नागरिकांचे 200 ते 250 रुपये वाचणार आहेत. मनपा पारदर्शक पद्धतीने काम करत आहे. पायाभूत सुविधा असतील तरच शहराचा विकास होतो, असेही ते म्हणाले. प्रारंभी अशोका गॅसच्या वतीने प्रकल्प समन्वयक शैलेश नखाते यांनी प्रकल्प उभारणी मागची भूमिका विषद केली. अशोका गॅसकडे 176 जिल्ह्याचे काम आहे. त्यापैकी प्रत्यक्षात काम सुरू होणारा आणि पारदर्शक कारभार असणारा लातूर लातूर हा एकमेव जिल्हा असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या