मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अन्य

वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री पंढरपुरला पूजेकरता रवाना!

उद्या शासकीय पूजा होणार

Gokul Pawar

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपुरला रवाना झाले आहेत. कारने मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील रवाना झाले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशी निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारी रद्द करण्यात आली.

उद्या आषाढी एकदशी असून या पार्श्वभूमीवर विठ्ठल रूक्मिणी यांची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री रवाना झाले आहेत. बुधवारी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्री आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. यासाठी आजच मुख्यमंत्री आणि कुटुंबिय पंढरपूरला रवाना झाले आहेत. वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपुरला पूजेकरता जाणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमातून सांगितले होते.

यावेळी फक्त मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय आणि मानाचे वारकरी जे पूजा करणारे आहेत त्यांनाच फक्त गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यंदा विठ्ठल ज्ञानदेव बडे हे मानाचे वारकरी विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहेत. बडे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळचे रहिवाशी आहेत. यंदा दर्शन रांग नसल्याने मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवड करण्यात आली.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच पंढरपुरात सात लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. वारकरी सेवा संघाने पंढरपूरला येणाऱ्या पादुकांसोबत १०० वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात येण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. वारीतील महत्त्वाच्या परंपरेतील नगर प्रदक्षिणा, स्नान आणि गोपाळकाला सोबत पौर्णिमेपर्यंत मुक्कामास परवानगी मिळावी, अशीही या वारकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com