
औरंगाबाद - aurangabad
महिला आयोगाच्या (Women's Commission) माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याबरोबरच शिक्षण व प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यात येत आहे. महिला व मुलांसाठी कुटुंबाचे हित लक्षात ठेऊन राज्य महिला आयोग काम करत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) आयोजित राज्य महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात (Collector Sunil Chavan, Deputy Commissioner of Police Aparna Gite) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी.एल.राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, एकात्मिक बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती निंभोरे, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे व अर्चना पाटील यांच्यासह महिला बाल कल्याण विभागाचे सर्व अधिकारी, तसेच सुनावणीसाठी विविध तक्रारदार महिला उपस्थित होत्या.
कमी कालावधीत तक्रारदार महिलांवरील अन्याय दूर करुन वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर समुपदेशनासाठी दोन वेळ पेक्षा जास्त वेळा गैरहजर राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास चाकणकर यांनी दिले. तसेच जिल्हा परिषद व महिला बाल कल्याण विभाग व इतर शासकीय विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने पिडित अथवा अन्यायग्रस्त महिलांना सुधारगृह किंवा राजगृहात 'भरोसा सेल' देण्या बरोबरच कौशल्यधारित प्रशिक्षण व रोजगार उपलब्धतेसाठी व्यावसायिक प्रशिक्षणासह साहित्य, विविध योजनांच्या समन्वयातून उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.
राज्य महिला आयोगाने महाविद्यालयीन तरुणींसाठी छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार अथवा अन्य तक्रारीसाठी राज्याने प्रथमच टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. 155209 या क्रमांकासह शहरी भागासाठी 1091 तर ग्रामीण भागासाठी 112 या क्रमांकवर तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी आवाहन देखील केले.
राज्य महिला आयोग आपल्या दारी' या कार्यक्रमात कौटुंबिक अन्यायाच्या तक्रारी वर सुनावणी घेण्यात आल्या. भरोसा सेल औरंगाबादमध्ये चांगले काम करीत असून समुपदेशानातून तक्रारी सोडवून पती, पत्नीसह कुटुंबातील इतर नात्यातील सदस्याच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचनाही संबधितांना करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी संरक्षण अधिकारी यांच्यासह ग्रामपंचयत सदस्य, लोकप्रतिनिधी, पोलीस, महिला बाल कल्याण या सर्व घटकांनी एकत्र काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मिशन वात्सल्य अंतर्गत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील महिलेला मदत दिली जात असल्याचे यावेळी श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.