
औरंगाबाद - aurangabad
बनावट कागदपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात जवाहरनगर पोलिसांनी आणखी दोन आरोपी ज्ञानेश्वर पंढरी पाटील (४२, रा. सह्याद्री अपार्टमेंट, बुलडाणा) आणि मयुर प्रतापसिंग चव्हाण (२९, रा. एकतानगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांना (२१ नोव्हेंबर) पहाटे अटक केली. त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सुंगारे-तांबडे यांनी दिले.
या गुन्ह्यात यापूर्वी सहा ते सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अमॅचुअर असोसिएशनच्या वतीने १९८८ ते २००५ या काळात १९ वर्षे वयोगटाखालील उमेदवारांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या नव्हत्या. तर १९९७ ते २००५ या काळात ट्रॅम्पोलिन व टम्बलिंग क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेच्या बनावट प्रमाणपत्राआधारे पाच टक्के आरक्षण मिळविण्यासाठी उमेदवार खेळाडूंनी २०१६ ते २०१९ या काळात ट्रॅम्पोलिन व टम्बलिंग या क्रीडा स्पर्धेतील सहभागाचे अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रस्तावासोबतच मूळ निकालात फेरफार केला. तसेच ट्रॅम्पोलिन संघटनेचे सचिव राजेंद्र पठाणीया यांच्या खोट्या व बोगस सह्या असलेले प्रतिज्ञापत्र, बनावट प्रवेश अर्ज व फॉर्म प्रस्तावासोबत सादर केले. या कागदपत्राआधारे उमेदवार खेळाडूंनी पाच टक्के आरक्षणांतर्गत अर्हता प्रमाणपत्र प्राप्त केले.
या बनावट कागदपत्राआधारे उमेदवारांनी शासकीय कार्यालयात नोकरी मिळवली. याप्रकरणी विभागीय उपसंचालक उर्मिला गणपतराव मोराळे यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात १८८ उमेदवार खेळाडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.